पिंपरी – वाढलेले वीजेचे दर, आर्थिक मंदी यामुळे उद्योजक बेजार झाले असताना दुसरीकडे दादागिरी आणि खंडणीखोरीमुळे भोसरी, तळवडे एमआयडीसीतील उद्योजक दहशतीखाली आहेत. अनेक उद्योगांचे स्थलांतरण सुरू आहे. एमआयडीसीला भयमुक्त करण्याची हीच वेळ आहे. उद्योजकांना त्रास देऊन आपला रोजगार हिरवणाऱ्यांना मतदारांनी मतदानांतून उत्तर द्यावे, असे आवाहन भोसरी विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी शनिवारी केले.
विलास लांडे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी औद्योगिक क्षेत्रातील कामगारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कामगारांनी व उद्योजकांनी औद्योगिक परिसरातील समस्यांचा पाढा लांडे यांच्यासमोर वाचला.
विलास लांडे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहर हे येथील उद्योगांमुळे उभे राहिले आहे. उद्योजक आणि कामगारांनी त्यांच्या घामाचे शिंपण घालून ही कामगारनगरी उभी केली. भाजप सरकारने स्टार्ट अप, मेक इन सारख्या सवंग घोषणा केल्या. मात्र, दुसरीकडे जुने उद्योग, धंदे वाचविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील पाच वर्षात विकासाचा दर खालावला. उद्योग कोलमल्यामुळे उद्योजक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
आर्थिक मंदीने उद्योगांची दैना झाली आहे. अशा परिस्थितीतून उद्योग सावरण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या तथाकथिक गुंड नेत्यांकडून कारखान्यांमधील कंत्राट मिळविण्यासाठी दहशत माजविली जात आहे. उद्योजकांकडून खंडण्या वसूल केल्या जात आहेत. असुरक्षिततेचे वातावरण उद्योगांमध्ये तयार झाले आहे. परिणामी उद्योगांचे स्थलांतरण वाढले आहे. येथील कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे. हे असेच चालू राहिल्यास शहराचा आर्थिक कणा ढासळेल. औद्योगिक परिसर भयमुक्त व दहशतमुक्त करण्याचा संकल्प आपण केला आहे. त्यासाठी उद्योजक व कामगारांनी आपल्याला साथ द्यावी, असे आवाहन लांडे यांनी केले.
एमआयडीसीच्या पुनरुज्जीवनासाठी आपण प्रयत्न करु, असे सांगून विलास लांडे यांनी औद्योगिक परिसरासाठीचा अजेंडा मांडला. पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसर स्वतंत्र टाऊनशिप जाहीर व्हावा, स्वतंत्र कचरा विलगीकरण केंद्र उभारले जावे, एमआयडीसीच्या सर्व सेवांसाठी ऑनलाइन सुविधा मिळाव्यात, औद्योगिक परिसरात अग्निशमन केंद्र, स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र, स्वस्तात वीज मिळावी यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे विलास लांडे यांनी सांगितले.






















