पिंपरी:- राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रोहित काटे यांच्या नेतृत्वात दापोडी येथे रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले. दापोडीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते वि.भा.पाटील पुलापर्यंतच्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाला वारंवार तक्रारी करूनही त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते. यावेळी सतीश काटे, अमोल काटे, अतिश परदेशी, सागर काटे, समीर शेख, दिनेश आवळे, जावेद नदाफ, निखील काटे, सुशांत गुजर, मंगेश काटे तसेच अनेक स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

नगरसेवक रोहित काटे म्हणाले की, दापोडी प्रभागात अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते वि.भा.पाटील पुलापर्यंतच्या रस्त्याची तर अक्षरश: चाळण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महापालिकेच्या स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांना अनेकदा या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमत झाल्यामुळेच येथील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. महापालिका प्रशासनाकडे यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत होते. म्हणूनच आज येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते वि.भा.पाटील पुलापर्यंतच्या मार्गावर पडलेल्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले. आता प्रशासनाने लवकरात लवकर दापोडी प्रभागातील रस्त्यांकडे लक्ष दिले नाही तर येत्या काळात अजूनही तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा काटे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here