दोंडाईचा-शिंदखेडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक
शिंदखेडा : दोंडाईचा-शिंदखेडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 पैकी 16 जागांसाठी निवडणूक झाली. येथील बिजासनी मंगल कार्यालयात मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. यात 12 जागांवर भाजपा पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीवर पुन्हा एकदा भाजपाने आपले वर्चस्व सिध्द करीत सत्ता राखली आहे.
दोंडाईचा-शिंदखेडा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तब्बल आठ वर्षांनंतर घेण्यात आली. सत्ताधारी रावल गटाला पराभूत करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेसह मित्रपक्षांनी आघाडी करत कंबर कसली. मात्र, अटीतटीच्या निवडणुकीत जयकुमार रावल यांच्या गटाने माजीमंत्री डॉ. हेमंत देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंखे व माजी आमदार रामकृष्ण पाटील यांना धक्का दिला.
दोन वेळा फेर मतमोजणी
मतमोजणी दरम्यान दोन वेळी फेर मतमोजणीची मागणी उमेदवारांकडून करण्यात आली. यामुळे निकाल घोषित होण्यास विलंब झाला. यात सहकारी संस्था सर्वसाधारण गटाच्या 7 जागांसाठीच्या फेर मतमोजणीबाबत विलास निंबाजी पाटील यांनी मागणी केली. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या सूचनेवरून फेर मतमोजणी केली. मात्र, यात कोणताही फरक पडला नाही. तसेच ग्रामपंचायत सर्वसाधारण गटाच्या दोन जागांसाठी पराभूत उमेदवार माधुरी मधुकर शिसोदे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. यापूर्वी त्या 17 मतांनी पराभूत होत्या. फेर मतमोजणीत 15 मते त्यांच्या पदरात पडून त्यांना केवळ दोन मतांवर निसटता पराभव स्वीकारावा लागला.
गटनिहाय विजयी उमेदवार व मिळालेली मते
सहकारी संस्था गट
अ) सर्वसाधारण मतदार संघ : नारायण बाजीराव पाटील 600 मते (शेतकरी पॅनल), मोतीलाल दोधा पाटील 589 मते (सहकार पॅनल), रवींद्र केशव पाटील 568 मते (शेतकरी पॅनल), जगतसिंग बाबुसिंग गिरासे 566 मते (शेतकरी पॅनल), रमेश सुदाम कोळी 554 मते (शेतकरी पॅनल), सखाराम आत्माराम पाटील 546 मते (शेतकरी पॅनल), सर्जेराव अभिमन पाटील 543 मते (सहकार पॅनल). ब) महिला मतदार संघ : जबाबाई इंदास पवार 634 मते (शेतकरी पॅनल), प्रतिभा सोमनाथ पाटील 604 मते (शेतकरी पॅनल). क) इतर मागासवर्गीय संघ : प्रशांत वसंत पाटील 642 मते (शेतकरी पॅनल). ड) भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघ : साहेबराव दगा धनगर 662 मते (शेतकरी पॅनल).
ग्रामपंचायत गट :
अ) सर्वसाधारण मतदार संघ : वाल्मिक दंगल बागूल 495 मते (शेतकरी पॅनल), शरद पंडीत भामरे 448 मते (सहकार पॅनल). ब) अनु. जाती जमाती मतदार संघ : अनिल भाऊराव गायकवाड 506 मते (शेतकरी पॅनल). क) आर्थिक दुर्बल घटक मतदार संघ : युवराज शिवाजी कदम 525 मते (शेतकरी पॅनल).
हमाल व तोलारी मतदार संघ
रतन केवजी भील 280 मते
(सहकार पॅनल).