वस्ताद विष्णूबुवा नखाते प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेचे संयोजन

पिंपरी : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने 63 वे अधिवेशन व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जानेवारी 2020मध्ये बालेवाडी येथे होणार आहेत. त्यासाठी पिंपरी चिंचवड परिसरातील कुस्तीगीरांची निवड चाचणी स्पर्धा मंगळवार दि. 24 डिसेंबर 2019 रोजी रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे होणार असल्याची माहिती निवड स्पर्धेचे आयोजक व ड प्रभाग स्वीकृत सदस्य संदीप भानुदास नखाते आणि पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस संतोष माचुत्रे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.

मंगळवारी (दि.24) होणा-या या स्पर्धेचा उद्‌घाटन समारंभ दुपारी 3 वाजता, तर बक्षीस समारंभ रात्री 9 वाजता होणार आहे. कुस्तीगीरांची वजने मंगळवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत घेतली जातील. स्पर्धा कुमार गट, माती गट व गादी गटात होईल. कुमार वजनी गट 45, 48, 51, 55, 60, 65, 71, 80, 92, 110 तर महाराष्ट्र केसरी वजनी गट 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97, 125 असा राहील. पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने दरवर्षी कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या वर्षीचा ‘कुस्ती जीवन गौरव पुरस्कार’ वस्ताद सुरेश पंढरीनाथ बारणे यांना देण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ व वस्ताद विष्णुबुवा नखाते प्रतिष्ठान आयोजित समाजभूषण हभप नारायण विष्णुबुवा नखाते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, समस्त ग्रामस्थ रहाटणीगाव यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेचे आखाडापूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यावेळी संयोजकांच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, महाराष्ट्र राज्य कूस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष हनुमंत गावडे, पिंपरी चिंचवड शहरातील प्रथम एनआयएस कुस्ती कोच किशोर हिरामण नखाते यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार अण्णा बनसोडे, उपमहापौर तुषार हिंगे, माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, रुस्तम ए हिंद योगेश दोडके, अमोल बुचडे, महाराष्ट्र केसरी विकी बनकर, राहुल काळभोर, दत्ता गायकवाड, अर्जून पुरस्कार विजेते काका पवार, ऑलिंम्पिक विजेते मारुती आडकर, ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, भारत केसरी विजय गावडे, उपमहाराष्ट्र केसरी विशाल कलाटे, सागर गरुड, भारतीय कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष विजय बराटे, वस्ताद चांगदेव अप्पा नखाते, हिंद केसरी अमोल बराटे तसेच ललित लांडगे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. 

या स्पर्धेचे निवेदन पैलवान शंकर अण्णा पूजारी, तर दिनेश गुंड, मोहन खोपडे, रोहिदास आमले, संदीप वांजळे, निवृत्ती काळभोर, विजय कुटे, विजय नखाते, बाळू काळजे, संदीप खांदवे, रवी बोत्रे, निलेश मारणे, विक्रम पवळे हे पंच म्हणून काम पाहणार आहेत.

वस्ताद सुरेश पंढरीनाथ बारणे कुस्तीजीवन गौरव पुरस्कार 2019’ यांचा अल्प परिचय

वस्ताद सुरेश बारणे यांनी वयाच्या 12व्या वर्षी चिंचवडगावातील पूर्वी पिंजा-यांची तालीम  व आता गांधीपेठ तालीम नावाने ओळखल्या जाणा-या तालमीत वस्ताद बाळासाहेब गावडे, फकीरभाई पानसरे, राजाराम बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती प्रशिक्षणास सुरुवात केली. पूर्वी गावच्या आखाड्यात कंत्रीटी मैदान भरवले जायचे. त्या काळात देखील सुरेश बारणे यांनी मावळ, मुळशी, हवेली व पुणे पंचक्रोशीतील अनेक मैदानांवर निकाली कुस्त्या मारल्या. त्यांची कठोर मेहनत वस्ताद मंडळींनी हेरली. पुढे त्यांना पुण्यातील अगरवाल तालीमचे वस्ताद नरहरी चोरघे व गुळशे तालीमचे वस्ताद भूजंगराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्यास पाठविण्यात आले. त्यांचा खेळ जस जसा वाढत गेला तस तसा त्यांचा नावलौकिक संपूर्ण पुणे जिल्ह्यात झाला. अल्पावधीतच त्यांना कोल्हापूर शाहूपूरी येथे वस्ताद मोहमंद हनीफ आणि रसूल हनीफ यांचे मार्गदर्शन मिळाले. तळेगाव येथे झालेल्या निकाली कुस्ती मैदानात त्यांनी पिंपरीच्या पैलवानाला मानेवर जासूद डाव टाकून चितपट केले. तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले व रोख इनाम म्हणून 600 रूपये बक्षीस मिळविले. यावेळी वस्ताद राघोबा लांडगे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. पैशासाठी नाही तर नावासाठी जिद्द ठेवून कुस्ती करायची हा त्यांचा गुण वस्ताद राजाराम बारणे यांच्या नजरेत आला. राजाराम बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकीतील बॉम्बे सॅपर्स येथे सुरेश बारणे यांनी अनेक निकाली कुस्त्यात बक्षीस मिळविले व मैदान गाजवले. आज वयाच्या 62व्या वर्षी वडीलोपार्जित पारंपरिक शेतीचा व्यवसाय ते सांभाळत आहेत. शक्ती बरोबरच नामभक्तीकडे त्यांचा ओढा आहे. गेल्या 25 वर्षापासून ते पंढरीची पायी वारी करीत आहेत. पंचक्रोशीतील हरीनाम सप्ताह, भजन, कीर्तन अशा सांप्रदायिक कार्यात देखील ते सेवा करीत आहेत. वस्ताद सुरेश पंढरीनाथ बारणे यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने ‘कुस्तीजीवन गौरव पुरस्कार 2019’ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास कुस्ती शौकीनांनी उपस्थित रहावे असे आवाहन कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस संतोष माचुत्रे, खजिनदार दिलीप बालवडकर, मुख्य संघटक धोंडीबा लांडगे, विजय गावडे, निमंत्रक हभप भानुदास नखाते, राष्ट्रीय कुस्ती पंच विजय नखाते, माजी स्वीकृत नगरसेवक सखाराम नखाते, नंदकुमार नखाते, मारुती नखाते, प्रदीप नखाते, कुलदीप नखाते, शुभम नखाते व रहाटणीगावातील समस्त ग्रामस्थांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here