Chaupher News
पिंपरी : येथील प्रत्येक नागरिकाच देशावर प्रेम आहे आणि ते कोणत्यातरी कागदाच्या आधारे सिद्ध करण्याची गरज नाही. आर्थिक मंदी व देशातील इतर मुद्यावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी सीएए, एनआरसी व एनपीआरची अमलबजावणी करण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र असल्याचा आरोप करतानाच साहेब मन की नही… दिल की बात करो, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता उमर खालिद यांनी लगावला.
सीएए, एनआरसी व एनपीआर विरोधात पिंपरी येथील डॉ. आंबेडकर पुतळा मैदानावर संविधान बचाव समितीच्यावतीने जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे होते. तर ज्येष्ठ विधी तज्ञ डॉ. अविक सहा प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
उमर म्हणाले, हा देश महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणार आहे. राज्यघटनेने सर्वाना सामान अधिकार दिलेत. मात्र काही राजकीय प्रवृत्ती हा अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रवृत्तीविरोधात व सामान्य जनतेच्या न्याय, हक्कांसाठी कायम लढत राहणार असल्याचेही ते म्हणाले.
डॉ. अविक सहा म्हणाले, नरेंद्र मोदी व अमित शहा हे केवळ राजकीय फायद्यासाठी असे कायदे आणू पाहत आहेत. जनतेने त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. एनपीआर मधील प्रश्नावलीद्वारे मुस्लिमांवर संशय घेतले जातील. देशात अराजकता माजविणारा हा कायदा लोकांच्या विरोधातून नक्कीच घालवता येईल, त्यासाठी अहिंसेच्यामार्गाने आंदोलनाची धार अधिक तीव्र केली पाहिजे, असे ते म्हणाले.
मानव कांबळे यांनी, अन्याकारक कायदे थांबवायचे असतील तर भाजपला सत्तेतून खाली खेचले पाहिजे. तसेच नागरिकत्वाची तपासणी करण्यासाठी येणाऱ्यांना कागदपत्रे दाखवू नका, असे आवाहन केले.
सीएए, एनआरसी व एनपीआर हिंदू आणि मुस्लिम समाजालाच अधिक त्रासदायक आहेत. त्यामुळे याविरोधात लढा अधिक तीव्र करणार असल्याचे, मारुती भापकर यांनी सांगितले.