Chaupher News

अनुभवी फिरकीपटू पूनम यादव हिच्या चार बळींच्या जोरावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला धावांनी पराभूत केले. जेमायमा रॉड्रीग्ज (२६) आणि दिप्ती शर्मा (४९*) या दोघींच्या भागीदारीच्या जोरावर भारताने २० षटकात ४ बाद १३२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे आव्हान दिले. आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर हेली हिने अर्धशतकी केली, पण पूनम यादवच्या फिरकीपुढे यजमान ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. या विजयासह भारताने स्पर्धेत विजयी सलामी दिली.
१३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी सावध सुरूवात केली आणि पहिल्या ५ षटकांत ३० धावांची भागीदारी केली. संयमी सुरूवातीनंतर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. अडखळती सुरूवात करत १३ चेंडूत ६ धावा करणारी बेथ मूनी माघारी परतली. ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगदेखील स्वस्तात माघारी परतली. सलामीवीर हेली दमदार अर्धशतकानंतर माघारी परतली. हेलीने ३५ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ५१ धावा केल्या. पण त्यानंतर ती लगेचच झेलबाद झाली.
फिरकीपटू पूनम यादवने आपला अनुभव पणाला लावत दोन चेंडूत दोन बळी टिपले. तिने आधी रॅचेल हेन्सला (६) बाद केले. तर त्यानंतर दमदार फलंदाज एलिस पेरीला पहिल्याच चेंडूवर तंबूत धाडले. पण तिची हॅटट्रिक यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे हुकली. पुढच्या षटकात पूनम यादवने चौथा बळी टिपला आणि ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का दिला. त्यानंतर यजमानांना डोकं वर काढता आलं नाही. अखेर १९.५ षटकात भारताने ऑस्ट्रेलियाला ११५ धावांत बाद केले आणि भारताने विजयी सलामी दिली. पूनम यादवने ४, शिखाने ३ तर गायकवाडने १ बळी टिपला.
त्याआधी, भारताकडून फलंदाजीसाठी उतरलेली स्मृती मानधना स्वस्तात पायचीत झाली. तर दणकेबाज सुरू केल्यानंतर आपला पहिला टी २० विश्वचषक सामना खेळणारी शफाली वर्माही फटकेबाजीच्या प्रयत्नात माघारी परतली. शफालीने धमाकेदार खेळी करत ५ चौकार आणि १ षटकार लगावला, पण १५ चेंडूत २९ धावा करून ती बाद झाली. भारताची अनुभवी कर्णधार हरमनप्रीत कौर पाठोपाठ मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात यष्टीचीत झाली आणि भारताला तिसरा धक्का बसला. तिला केवळ २ धावाच करता आल्या.
तीन बळी झटपट बाद झाल्याने मुंबईकर रॉड्रीग्जने दिप्ती शर्मासोबत सावध खेळ केला. त्या दोघींनी डावाला आकार दिला. पण धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात अखेर रॉड्रीग्ज माघारी परतली. तिने ३३ चेंडूत २६ धावा केल्या. दिप्ती शर्माने मात्र शेवटपर्यंत झुंज दिली आणि नाबाद ४९ धावा केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here