नवी दिल्ली – टीम इंडिया आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये नंबर-1 टीम बनली आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव केला. 15 फेब्रुवारीला कसोटी संघाची क्रमवारी अपडेट होताच टीम इंडिया नंबर 1 कसोटी संघ बनली. रोहित शर्मा टीम इंडियाचा सर्व प्रकारचा कर्णधार आहे. रोहित हा जगातील पहिला कर्णधार बनला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 आहे. एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला भारत हा आशियातील पहिला संघ आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 चा दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कसोटी क्रमवारीत भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 111 रेटिंग गुण आहेत, तर भारताच्या खात्यात 115 रेटिंग गुण आहेत. इंग्लंड 106 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर आहे, तर दक्षिण आफ्रिका पाचव्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिज सहाव्या, तर पाकिस्तान सातव्या क्रमांकावर आहे. आठव्या क्रमांकावर श्रीलंका, नवव्या क्रमांकावर बांगलादेश तर दहाव्या क्रमांकावर झिम्बाब्वे.
एकदिवसीय संघ क्रमवारीत भारत अव्वल, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आणि न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे.T20 संघ क्रमवारीत भारत अव्वल स्थानावर कायम आहे, तर इंग्लंड आणि पाकिस्तान अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.