मॉल अथवा धाब्यावर एस. टी. बस थांबल्यास चहा-नाश्ता आणि खाद्य पदार्थांसाठी अवाच्या सव्वा किमती आकारून प्रवाशांची लूट केली जाते. ही आर्थिक लूट थांबविण्यासाठी एस. टी. महामंडळाने 30 रुपयांत चहा-नाश्ता योजना आणली आहे. लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गावरील 22 अधिकृत थांब्यांवर या योजनेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे.
राज्य व राष्ट्रीय महामार्गावर
धावणारी लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या एस. टी. बसेस अल्पोपाहारासाठी ज्या अधिकृत थांब्यांवर थांबतील, तेथील उपाहारगृहांत प्रवाशांना ही सोय उपलब्ध होणार आहे. खासगी हॉटेल चालकांकडून प्रवाशांची होणारी ही लूट रोखण्यासाठी एस. टी. महामंडळाने पाऊल उचलले आहे. एस. टी.च्या प्रवासात अल्पविश्रांतीसाठी थांबलेल्या प्रवाशांना तेथील उपाहारगृहांत अवाजवी दरात खाद्यपदार्थांची विक्री केली जाते, अशा स्वरूपाच्या तक्रारी प्रवाशांकडून वारंवार होत आहेत.
त्या अनुषंगाने एस. टी. प्रवाशांची पिळवणूक थांबविण्याच्या उद्देशाने एस. टी.च्या वाहतूक शाखेकडून परिपत्रकाद्वारे आदेश देण्यात आले असून, त्यानुसार प्रवाशांना केवळ 30 रुपयांत उत्तम प्रतीचा चहा आणि नाश्ता देण्याच्या सूचना
दिल्या आहेत.
तसेच उपाहारगृहातील इतर खाद्यपदार्थांचे दरपत्रक प्रवाशांना सुस्पष्टपणे दिसेल, अशा ठिकाणी प्रदर्शित करण्यात यावे, असे स्पष्ट सांगितले आहे. याबाबत प्रवाशांना कोणत्याही प्रकारची असुविधा झाल्यास, त्यांच्या तक्रारीवरून संबंधित उपाहारगृहाचा परवाना रद्द करण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते.