पिंपरी : दिवाळी सण सुरू झाला आहे. नवीन कपडे, फराळाचे साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरू आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, सगळ्यांच्याच आयुष्यात हा उत्साह असतो असे नाही. त्यामुळेच सामाजिक बांधिलकी जपत साद सोशल फाउंडेशच्या वतीने बुधवारी (दि. 26) अंध कुटुंबीयांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतिक भवनात फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडूरके, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर चौगुले, निगडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पळसुले, वाकड ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमृत मराठे, पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, अभि इम्पॅक्ट लॉजिस्टिकचे जितेंद्र जोशी, तनिष्क ग्रुपचे दिलीप सोलंकी, आशा ग्रुपचे अरविंद सोलंकी, मुंगीपा स्टीलचे राजेश मुंगिप्पा, एक्सेन ग्रुपचे भिमसेन अगरवाल, कृष्णा कन्स्ट्रक्शन कंपनीचे संजय सोलंकी, दुधाराम चौधरी, निलेश देसाई, एच. एम. शेख, निरंजन आगरवाल, उद्योजक हरिश पुरोहित, साद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा कामगार नेते इरफान सय्यद, उपाध्यक्ष डॉ. महेश शेटे, नितीन धोत्रे, प्रमोद शेलार, अमित जैन, डॉ. अरविंद खरात, जितेंद्र जैन, रमेश चौधरी, राकेश मेहता, किसन बावकर, पिंपरी-चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अनिल कातळे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. शामराव अहिरराव आदी उपस्थित होते. साद सोशल फाउंडेशन नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. गेल्या दोन वर्षापासून साद फाउंडेशनतर्फे फराळाचे वाटप करण्यात येत आहे. यंदा महिला बचत गटांनी उत्पादित केलेले फराळाचे पदार्थ 250 अंध कुटुंबाला वाटप करण्यात आले. चकली, चिवडा, कंरजी, शंकरपाळे, लाडू, असे विविध पदार्थ असलेली 15 किलोची पिशवी अंध बांधवांना देण्यात आली. फराळाचे साहित्य मिळाल्यानंतर अंध बांधवांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता. तत्पूर्वी अंध बांधवांची गाण्याची मैफल झाली.
यावेळी डॉ. शाम अहिरराव यांनी सादच्या माध्यमातून मरणोत्तर नेत्रदानाविषयी जनजागृती करण्याचा संकल्प सोडला. तसेच मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडूरके यांनी सादच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
प्रविण जाधव, परेश मोरे, राहुल कोल्हटकर, रोशन मोरे, अनिल दळवी यांनी संयोजनात पुढाकार घेतला.