स्वच्छतेचे महत्व पटल्याने नागरिकांचा सहभाग वाढतोय – अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ
पिंपरी, दि. ८ डिसेंबर २०२२:- स्वच्छतेचे महत्व आता नागरिकांना पटायला लागले असून नागरिक स्वयंस्फुर्तीने स्वच्छता व कच-याचे विलगीकरण मोहिमेत सहभागी होत आहेत. शहरातील प्रत्येक घटकापर्यंत स्वच्छतेबाबत माहिती पोहचविल्यास महापालिकेला स्वच्छतेच्या मोहिमेत नक्कीच यश मिळेल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अर्बन आऊटकम फ्रेमवर्क अभियानांतर्गत सिटीझन परसेप्शन सर्व्हेबाबत पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे कर्मचा-यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये शहरातील स्वच्छता आणि कचऱ्याचे विलगीकरण करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आयईसी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री. वाघ बोलत होते. यावेळी उपआयुक्त अजय चारठाणकर, स्वच्छ सर्वेक्षण समन्वयक विनोद जळक, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सोनम देशमुख, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, शितल वाकडे, विजयकुमार थोरात यांच्यासह सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक, महापालिकेचे कर्मचारी, बेसिक्स, डिवाईन, जनवाणी, ऑल इंडिया इन्सटीटयूट आयईसी संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना स्वच्छ सर्वेक्षण क्षमता बांधणी तज्ञ बलजित सिंघ आणि मेट्रिक्स ह्युमन सेक्युरिटी संस्थेचे गोविंद माधव यांनी प्रशिक्षण दिले. प्रारंभी, स्मार्ट सिटी टीमद्वारे अर्बन आऊटकम फ्रेमवर्क अभियानांतर्गत करण्यात येत असलेल्या सिटीझन परसेप्शन सर्वेमध्ये नागरिकांना सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यासाठी मार्गदर्शन केले.
अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कचरा विलगीकरण करणा-या नागरिकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. अद्यापही काही नागरिक कचरा विलगीकरण संबंधी सूचनांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी प्रत्यक्ष कचरा विलगीकरण करण्याच्या मोहिमेत सक्रीय सहभाग घेत स्वतःच्या घरात विलगीकरण केलेला कचरा घंटा गाडीत टाकताना वेगवेगळा द्यावा. ओला, सुका, घरगुती घातक, सॅनिटरी वेस्ट आणि प्लास्टिक अशा वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये टाकावा. याबाबत घंटा गाडी सोबत असलेल्या आय ई सी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना मार्गदर्शन करावे. तसेच घंटा गाडीवर वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये टाकावयाच्या कच-याचे नागरिकांना स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने तपशीलवार स्टिकर लावावेत, कचरा विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांची नोंद करून घ्यावी. सूचना देऊनही कचरा विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया गतिमान करावी, अशा सूचना देखील त्यांनी यावेळी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या. मोहिमेत हलगर्जीपणा करणा-यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच नागरिकांपर्यंत स्वच्छता आणि कचरा विलगीकरणाबाबत योग्य व प्रभावीपणे माहिती देणा-यांचा उत्कृष्ट कार्याबद्दलचा महापालिकेच्या वतीने सन्मान देखील होईल, असेही ते म्हणाले.