पिंपरी :- समाजातील काही विद्यार्थी आर्थिक परिस्थिती अभावी स्वत:ची सायकल घेऊ शकत नाहीत. तसेच वाहतुकीच्या साधनांअभावी रोज पंचवीस ते तीस किलोमीटरची पायपीट करत शिक्षणाची वाट धरत आहेत. अशाच गरजू अलोक गोडसे व अरव गोडसे या विद्यार्थ्यांची शिक्षणाची बिकट वाट सुकर करण्यासाठी सोशल हॅन्ड फाउंडेशन तर्फे दोन सायकली प्रदान करण्यात आल्या.
रोज पंचवीस ते तीस किलोमीटरची पायपीट करून शाळेत जाणाऱ्या आणि अनेकांची प्रेरणा ठरलेल्या अलोक गोडसे याला निगडी मधील ओझर्डे रॅडिकल इन्स्टिट्यूट मध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात सोशल हॅन्ड फाउंडेशन तर्फे सायकल भेट देण्यात आली. तसेच सामाजिक कार्यकर्त्या मंजुश्री राजपूत यांच्याकडून आलोकचा लहान भाऊ अरवला सायकल भेट देण्यात आली. प्रा.भूषण ओझर्डे यांनी आलोकची पुढील कोचिंग क्लासेसची जबाबदारी ओझर्डे इन्स्टिट्यूट स्वीकारणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अकाउंट ऑफिसर जी.बी. गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कामराज, सोशल हॅन्ड फाउंडेशनचे मदन दळे, प्रा.भूषण ओझर्डे, सचिन अडागळे, डॉ. शीतल महाजन, चांगदेव कडलक आणि विलास मोहिते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री ओझर्डे यांनी केले. दिपाली ओझर्डे यांनी आभार व्यक्त केले.
या विद्यार्थ्यांनी आपली ओझर्डे रॅडिकल इंस्टीट्यूट ऑफ एज्युकेशनचे संचालक प्रा.भूषण ओझर्डे यांना सांगितली. अलोकची शाळा प्राधिकरणातील गुरुगणेश विद्या मंदिरात असून, विद्यार्थ्यांना पंचवीस ते तीस किलोमीटर पायी चालत येऊन शिक्षण घ्यावे लागत होते. कोणत्याही वाहनांची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा बराच वेळ जाण्या-येण्यातच वाया जात होता. त्यासाठी या विद्यार्थ्यांना सोशल हॅन्ड फाउंडेशन व सामाजिक कार्यकर्त्या मंजुश्री राजपूत यांच्यामार्फत सायकलींची मदत मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरून आनंद ओसांडून दिसत होता.