आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे मुख्याध्यापकांना आवाहन
आचार्य यत्रे सभागृहात झालेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात ५०० हून अधिक मुख्याध्यापकांचा सहभाग
पिंपरी :- शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना व सर्जनशील विचारांना चालना मिळावी, यासाठी ‘जल्लोष शिक्षणाचा २०२३’ हा उपक्रम एक उत्तम व्यासपीठ आहे. या स्पर्धात्मक उपक्रमामध्ये शहरातील जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. आचार्य यत्रे सभागृह येथे गुरुवारी ‘जल्लोष शिक्षणाचा २०२३’ या उपक्रमाचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित ५०० हून अधिक मनपा व खाजगी शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना आयुक्त शेखर सिंह बोलत होते.
महापालिकेच्या वतीने जल्लोष शिक्षणाचा २०२३ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या स्पर्धात्मक उपक्रमामध्ये शहरातील मनपा व खाजगी शाळांना सहभागी करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या वतीने अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क या उपक्रमांतर्गत ‘चला आपले शहर जाणून घेऊया’ याबाबत शहरात सर्वेक्षण सुरु असून या सर्वेक्षणात शाळा, विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग वाढावा, या अनुषंगाने मुख्याध्यापकांशी संवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शिक्षण विभागाचे उपआयुक्त संदीप खोत, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान, पर्यवेक्षक सुनील लांघी यांच्यासह शहरातील मनपा व खाजगी शाळांचे ५०० हून अधिक मुख्याध्यापक तसेच शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘जल्लोष शिक्षणाचा २०२३’ हा उपक्रम नाविन्यपूर्ण गोष्टींना अनुसरून आहे. शाळांच्या सर्जनशील कल्पना, मुलांच्या कलागुणांना उत्तम व्यासपीठ मिळावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील विजेत्या शाळा आणि विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने बक्षिस देण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये शहरातील जास्तीत जास्त शाळांचा सहभाग अपेक्षित असून मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टी देखील माहित असल्या पाहिजे. मुलांना आपल्या शहराबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वतीने शहरामध्ये कोणते उपक्रम राबविले जात आहेत. याबद्दल विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना आपल्या शहराबाबत काय मत आहे, हे जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क या उपक्रमांतर्गत ‘चला आपले शहर जाणून घेऊया’ याबाबत शहरात सर्वेक्षण सुरु आहे. या उपक्रमाद्वारे आपले शहराबद्दलचे मत नोंदवून पिंपरी चिंचवड शहराला देशात प्रथम क्रमांकाने विजयी करायचे आहे. विद्यार्थ्यांमार्फत पालकांपर्यंत हा संदेश पोहोचवल्यास हे सर्वेक्षण व्यापक प्रमाणात होण्यास मदत होणार आहे. यासाठी सर्वांचा सहभाग आणि सहकार्य अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.
महापालिकेच्या सीटीओ टीमच्या ऋतुजा करकरे आणि प्रज्ञा ठाकूर यांनी ‘जल्लोष शिक्षणाचा २०२३’ याबाबत सविस्तर माहिती दिली. स्मार्ट सारथी टीमचे आशिष चिकणे यांनी ‘अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क’ संदर्भात माहिती यावेळी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पौर्णिमा भोर यांनी केले.