वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुण्यातील रंगभूमी कलावंतांमध्ये ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांची खास ओळख होती. गेली 55 वर्ष त्यांनी याच क्षेत्रात काम केलं होतं.
ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचे आज पुण्यात निधन झालं आहे. ते 78 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते पुण्यात मुलीच्या घरी राहात होते. त्यांच्या जाण्याने रंगभूमीचा रंगभूषाकार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. नाट्यसृष्टीत ते भावेकाका म्हणून परिचित होते. नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यांना ब्रेनटयूमर झाला होता. हळूहळू त्यांचे अवयव निकामी होऊ लागले होते.
55 वर्ष रंगभूषाकार म्हणून काम
पुण्यातील रंगभूमी कलावंतांमध्ये ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांची खास ओळख होती. गेली 55 वर्ष त्यांनी याच क्षेत्रात काम केलं होतं. नाटकातील मुखवटे तयार करण्यात त्यांचा हातखंडा होता. भावे यांनी त्यांच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकणारे ‘रंगभूषा’ नावाचे पुस्तक देखील लिहिले होते. या पुस्तकाला राज्य सरकारचा उत्तम साहित्यकृतीचा पुरस्कार देखील मिळाला होता.
चेहऱ्याला केवळ रंग लावणे म्हणजे रंगभूषा नाही. भूमिकेनुसार रंगांचा वापर करणे आणि त्यासाठी कमीत कमी रंग वापरणे महत्त्वाचे असते. रंगांचा अतिरेक झाला तर नाटक फसते, अशी भावे यांची धारणा होती.
मूळचे साताऱ्याचे असलेले भावे यांना लहानपणापासून नाटक, संगीत, साहित्याची आवड होती. मात्र साताऱ्यात त्यांच्या कलेला पुरेसा वाव नसल्याने ते पुण्यात आले. सुरुवातीच्या काळात नोकरी करत त्यांनी एकांकिका, नाटकांच्या रंगभूषेचे काम सुरू केले. प्रभाकर भावे यांच्या वडिलांना नाटकाची खूप आवड होती. त्यांना कलेची आवड असल्याने अनेक कला त्यांना अवगत होत्या. वडिलांंकडून प्रभाकर भावेंनी रंगभूषा शिकून घेतली. त्यावेळी त्यांचं वय खूप कमी होतं. लहान वयातच त्यांना रंगभूषेविषयी उत्सुकता वाटायला लागली होती. त्यानंतर त्यांनी हळुहळू रंगावर प्रेम करायला सुरुवात केली. त्यांनी ‘सवाई माधवरावाचा मृत्यू’ आणि ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ ही नाटकं पाहिली. त्या नाटकातील शिवाजी महाराज आणि बाकी कलाकृती पाहून त्यांनी रंगभूषा या क्षेत्रामध्येच करियर करायचं हे त्यांनी ठरवलं. त्यामुळे पुण्याच्या नाट्यविश्वाला हक्काचा रंगभूषाकार मिळाला. त्यांच्या मृत्यूमुळे रंगभूषेच्या क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.