अहमदनगर : शिर्डीच्या साई मंदिरात साई भक्तांकडून नेहमीच देणगी दिली जाते. नव्या वर्षाच्या सुरुवातीला अनेक भक्तांकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या देण्यात आल्या. हैदराबाद येथील एका साईभक्ताने चक्क 1 कोटी रुपये देणगी स्वरुपात दिले आहेत. राजेश्वर असं त्याचं नाव आहे.
हैदराबाद येथील साईभक्त राजेश्वर यांनी त्यांच्या फर्मच्या नावाने साई मंदिरात ही देणगी दिली आहे. त्यांनी साई कृपा वेंचरच्या नावे श्री साईबाबा संस्थानला मेडीकल फंडकरीता रुपये 25 लाखांचे 4 डिमांड ड्राफ्ट असे एकुण 1 कोटी रुपये देणगी दिली आहे. हे डिमांड ड्राफ्ट संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे सुपुर्त केले. तसेच हैदराबाद येथील ओम श्रीराम बिल्डर्सचे सुभ्बा रेडडी हे त्यांच्या वाढदिवासा निमित्त श्री साईबाबा हॉस्पिटलकरीता सुमारे ४० लाख रुपये किमतीचे एक्सरे मशिन देणगी देणार असल्याची माहिती राजेश्वर यांनी यावेळी दिली. यावेळी संस्थानचे मुख्यलेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी कैलास खराडे उपस्थित होते. याबरोबरच चेन्नई येथील देणगीदार साईभक्त श्री.व्ही.जितेंद्र यांनी ५४४ ग्रॅम वजनाची २७ लाख ७७ हजार ६६४ रुपये किंमतीची सोन्याची आरती श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिली.
श्री साईबाबा संस्थानला गेल्या वर्षी एकूण 400 कोटी 17 लाख 64 हजार 201 रुपये देणगी म्हणून मिळाले आहेत. 25 डिसेंबरनंतर नववर्षाच्या मुहूर्तावर 17 कोटी 81 लाखांहून अधिक रुपयांची देणगी आली. नववर्षाच्या काही दिवसांतच आठ लाखांहून अधिक भाविकांनी शिर्डी मंदिरात दर्शन घेतले. 400 कोटींहून अधिक रकमेपैकी 167 कोटी 77 लाख एक हजार 27 रुपये दानपेटीत आले. देणगी काउंटरवर 74 कोटी 3 लाख 26 हजार 464 रुपये कपात करण्याच्या पावत्यातून आले. ऑनलाइन पेमेंट, मनीऑर्डर, धनादेश आदींद्वारे 144 कोटी 45 लाख 22 हजार 497 रुपये देणगी म्हणून प्राप्त झाले. एकूण देणगीमध्ये सोने, चांदी इत्यादी दागिन्यांची किंमत देखील समाविष्ट आहे. श्री साई मंदिर ट्रस्टचे पीआरओ एकनाथ गोंदकर यांच्या मते, राजा दत्ता आणि बेंगळुरूच्या शिवानी दत्ता यांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने श्री साईबाबांना ९२८ ग्रॅम सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे.