भाजपला जनताच खरा शॉक देणार असल्याचा पुनरुच्चार
पिंपरी –राज्यातील बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी नको ते मुद्दे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून उकरुन काढले जात आहेत. राज्यापुढील खरी आव्हाने कोणती आहेत, त्याला कारणीभूत कोण आहे, त्याचा माध्यमांनी आणि जनतेने विचार करावा, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले. रहाटणी येथे विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी पवार यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी मांडल्या. त्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते.
‘नाना काटे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते मनापासून प्रयत्न करत असून या निवडणुकीत काटे यांचा विजय निश्चित आहे. देशाला आणि राज्याला समस्यांच्या खाईत लोटणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनता वैतागली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही’, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवार यांना ४४० व्होल्टचा शॉक देणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे, त्याबाबत पवार म्हणाले, ‘त्यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. खरा शॉक देणारी जनता आहे. त्यामुळे अशा बाष्फळ बडबडीकडे मी फार लक्ष देत नाही.’ माध्यमांनीही त्याकडे दुर्लक्ष करावे, असे पवार यांनी स्पष्ट केले.
उध्दव ठाकरे यांना ब्लॅकमेल केले असल्याचा आरोप भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे, त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, असे मोघम आरोप कोणी करू नयेत. त्यांना कोणी ब्लॅकमेल केले ते स्पष्टपणे सांगावे म्हणजे त्याचा संबंधितांना खुलासा करता येईल. नागपूर अधिवेशनात चार ते पाच मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आली होती. काही काळ माध्यमांनी ती लावून धरली. मात्र नंतर भावनिक मुद्दे बाहेर काढून जनतेचे लक्ष त्यापासून विचलीत केले. त्यानंतर त्या मंत्र्यांना अलगद क्लीन चिट देण्यात आली. ही भारतीय जनता पक्षाची पध्दतच आहे, असेही त्यांनी सांगितले.
आमच्या उमेदवाराचा प्रचार आम्ही करत आहोत. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विविध व्यावसायिक, नोकरदार आणि सामान्य जनता या सत्ताधाऱ्यांमुळे मेटाकुटीला आली आहे. जनता त्यांना धडा शिकवल्याखेरीज राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.