पुणे : कसब्याच्या (Kasba) चुरशीच्या पोटनिवडणुकीत मतमोजणीच्या १४ व्या फेरीसअखेरीस पाच हजारांहून अधिक विजयाचे लिड काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. पन्नास बोके-पन्नास खोके, अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्यात. वाघ आला रे वाघ आला, असंही कार्यकर्ते म्हणतायेत. तर हा जनतेचा विजय असल्याची पहिलीच प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे.
हा जनतेचा विजय असल्याचं, ही निवडणूक पहिल्या दिवसापासून जनतेनं हातात घेतल्याची प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे. आपल्या राजकारणात सर्वसमावेशकता आहे. जाती-धर्मांच्या पलिकडे जाऊन आपण काम केल्याची पावती आज आपल्याला मिळत असल्याचं धंगेकर म्हणाले आहेत. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्याचंही धंगेकर यांनी सांगीतलं. कसबा विधानसभेतील मतदार हा स्वाभिमानी आहे, त्याने भाजपाच्या पैशांना भीक घातली नसल्याचंही धंगेकर म्हणालेत. भाजपाचं वर्चस्व मानण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक १५ मध्येही आपल्याला चांगली मतं मिळतील, हे आपण पहिल्यापासून सांगत होतो, असंही धंगेकर म्हणालेत.
विजयानंतर आजारी असलेले खासदार आणि भाजपा नेते गिरीश बापट यांची भेट घेणार असल्याचंही रवींद्र धंगेकर यांनी म्हटलय. बापट हे ज्येष्ठ नेते आहेत. पाच वेळा ते आमदार आणि खासदार होते. त्यांचे जाऊन आशीर्वाद घेणार असल्याचंही धंगेकर यांनी सांगितलंय.
या निकालाचे पडसाद आता राज्यभरात दिसतील, राज्यभरात या निर्णयाची पुनरावृत्ती होईल, असंही रवींद्र धंगेकर म्हणालेत. उद्धव ठाकरे यांच्यावर जो अन्याय झाला, त्याचा राग जनतेच्या मनात असल्याचं त्यांनी सांगितलं. नाना पटोले आणि अजित पवार यांनी फोन करुन अभिनंदन केल्याचंही धंगेकरांनी स्पष्ट केलंय.