पिंपरी :- कलावंत पोट भरण्यासाठी धडपडतो. पोटासाठी प्रत्येक जण काहीतरी करतो. मात्र जे करायचे आहे. ते चांगले करावे, असे मत लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
गौतमी पाटील हिची लावणी नसून डीजे डान्स आहे, अशी टीकाही त्यांनी केली. चिंचवड येथे २५ आणि २६ मार्चला राज्यस्तरीय महालावणी स्पर्धा होणार आहे. त्याबाबत रविवारी चिंचवड येथे पत्रकार परिषद झाली. त्यावेळी सुरेखा पुणेकर बोलत होत्या. यावेळी आमदार उमा खापरे, माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे उपस्थित होत्या.
सुरेखा पुणेकर म्हणाल्या, तरुण कलावंतांनी लावणी समजून घेतली पाहिजे. ती शिकून घेतली पाहिजे, अशा कलावंतांना मी लावणी शिकवू शकते.
तमाशाचा ऑर्केस्ट्रा केलाय…
लावणीमध्ये सवाल जवाब हा प्रकार सध्या पाहायला मिळत नाही. त्यासाठी कलावंतांनी प्रयत्न केले पाहिजेत. सध्या तमाशाचा ऑर्केस्ट्रा झाला आहे. वग हा प्रकार मागे पडत आहे. याला कलाकारच जबाबदार आहेत. आपण आपली पारंपरिक कला लोकांपर्यंत पोहोचविली पाहिजे, असे आवाहन सुरेखा पुणेकर यांनी केले.