चौफेर न्यूज – महापालिका कर्मचा-याच्या कष्टाच्या पैशावर स्वर्गीय शंकर अण्णा गावडे स्मृती कामगार भवन उभारले. तर वायसीएम रुग्णालयात मेडीकल सुरु करण्यात आले. पण, सत्ता आणि खुर्ची मोहापायी दोघांच्या भांडणात आजही कामगार भवन आणि मेडीकल टाळे लागले आहेत. कदाचित उद्या पतसंस्थेला देखील टाळे लागू शकतील, त्यामुळे महापालिका कर्मचारी महासंघ हा एकत्रित राहिला पाहिजे, ही भूमिका घेवून शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचने पतसंस्थेत स्वतंत्र पॅनेल उभा केले. या पॅनेलला सर्व अधिकारी-कर्मचा-यांचा उत्स्फुर्त पाठिंबा मिळत असून पतसंस्थेत निश्चितपणे परिवर्तन घडेल, तसेच आम्ही ना सत्तेसाठी, ना खुर्चीसाठी, केवळ कर्मचा-यांचे हित आणि लोककल्याणासाठी कायम लढत राहणार, असा विश्वास पॅनेल प्रमुख संजय ऊर्फ बापू जगदाळे यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पंतसस्थेची पंचवार्षिक निवडणुक जाहीर झाली आहे. या पतसंस्थेचे मतदान मंगळवार दि. 11 एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मनपा मुख्य कार्यालयात होणार आहे. या निवडणुकीत शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचला सर्व अधिकारी-कर्मचारी वर्गातून पाठिंबा मिळत असून पॅनेलने प्रचारात आघाडी घेतल्याने त्याचे पारडे जड दिसू लागले आहे.
महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था निवडणुकीत नवीन चेह-यांना संधी दिली आहे. पारदर्शक, गतीमान कारभाराचे आश्वासन देत शिव-फुले- शाहू- आंबेडकर विचार मंचला एक संधी देवून सत्ता परिवर्तन करण्याचा निर्धार महापालिका कर्मचारी वर्गाने केला आहे. विशेषता आरोग्य, वैद्यकीय, करसंकलन, स्थापत्य, बांधकाम, सर्व क्षेत्रीय कार्यालयासह अन्य पालिका कर्मचा-यांनी टीव्ही चिन्हावर मतदान करुन सत्ता परिवर्तन करण्याचा जणू चंगच बांधला आहे.
पॅनेल प्रमुख संजय जगदाळे म्हणाले की, आज महापालिकेतील कर्मचारी, पतसंस्थेचा सभासद हा विविध कारणांनी त्रस्त आहे. कर्मचा-यांच्या कष्टाच्या पैशातून स्वर्गीय शंकर अण्णा गावडे स्मृती कामगार भवन बांधण्यात आले. त्याचे बांधकाम पुर्ण होवूनही दोन वर्ष झाले. तरीही ते बंद अवस्थेत आहे. कर्मचा-यांना वापरण्यासाठी अद्याप खुलं केलेले नाही. पण, सत्ताधारी कर्मचारी महासंघाच्या बैठका नियमित तिथे घेतल्या जातात. वायसीएम रुग्णालयात कर्मचा-यांना स्वस्तात औषधे उपलब्ध व्हावीत, म्हणून मेडीकल सुरु केले. ते देखील दोन वर्ष झाले बंद आहे. तेथील लाखो रुपयाची औषधे वाया गेली. तिथे देखील कर्मचा-यांना बाहेरुन गोळ्या-औषधे खरेदी कराव्या लागत आहेत.
मात्र, महासंघाच्या आजी-माजी सत्ताधा-याच्या वादात कामगार भवनासह मेडीकलला टाळे लागले आहेत. दोन्ही आजी-माजी पदाधिका-यांमुळे पालिका कर्मचा-यांचे नुकसान होवू लागले आहे. त्याला जबाबदार कोण? असा जाब आजी-माजी महासंघाच्या अध्यक्षांना विचारायला हवा. कामगार भवन आणि मेडीकल आजही बंद अवस्थेत आहेत. काही दिवस महासंघाला देखील टाळे लागले होते. उद्या कदाचित पतसंस्थेला देखील टाळे लागतील, म्हणून कर्मचा-याचा महासंघ एकत्र राहिला पाहिजे, या तळमळीने आम्ही स्वतंत्र पॅनेल उभा केले आहे. याकरिता सर्व सभासद बंधू-भगिनीनो.. आपण शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्या सर्व उमेदवारांना टीव्ही चिन्हासमोर मतदान करुन प्रचंड मतानी विजयी करावे, असे आवाहन जगदाळे यांनी केले आहे.