पिंपरी :- आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १० जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे, अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळाप्रमुख संजय महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदाच्या पालखी सोहळा प्रमुखपदी संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांची निवड संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी शनिवारी जाहीर केली. संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे, विश्वस्त विशाल महाराज मोरे व इतर उपस्थित होते.
संजय महाराज मोरे म्हणाले, ‘‘यंदा ३३८ वा पालखी सोहळा आहे. पहिल्या दिवशी पालखी देहूतील इनामदारवाड्यात मुक्कामी आहे. यंदा पालखी मार्गावर काही किरकोळ बदल केले आहेत. पूर्वी इंदापूर येथील शाळेत पालखी सोहळा मुक्कामी असायचा. यावर्षी इंदापूरमधील नव्याने तयार केलेल्या आयटी मैदानावर पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे.
पालखी सोहळा १० जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. ११ जूनला सकाळी इनामदारवाड्यातून आकुर्डीकडे पालखी सोहळा मार्गस्थ होईल. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात सायंकाळी पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे. १२ जूनला पहाटे पालखी सोहळ्याचे पिंपरीतील एच. ए. मैदान, कासारवाडी, शिवाजीनगरमार्गे पुण्यातील नानापेठ येथील विठ्ठल मंदिरात आगमन होईल. १३ जूनला पालखी सोहळा नानापेठ येथील निवडुंगा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुक्कामी असेल. १४ जूनला सकाळी पालखी सोहळा हडपसरमार्गे लोणीकाळभोर येथे मुक्कामासाठी पोचणार आहे. १५ जूनला सोहळा यवत येथील भैरवनाथ मंदिरात मुक्कामी असेल. १६ जूनला वरवंड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुक्कामी असेल. १७ जूनला वरवंड येथून सोहळा उंडवडी गवळ्याची येथे मुक्कामासाठी असेल. १८ जूनला बऱ्हाणपूर, मोरेवाडी मार्गे पालखी सोहळा बारामती येथील शारदा विद्यालयाच्या पटांगणात मुक्कामी असेल. १९ जूनला सणसर येथील पालखी तळावर मुक्कामाला असेल. वीस जूनला सणसरमार्गे पालखी सोहळा बेलवंडी येथे पोचेल. बेलवंडी येथे पहिले गोल रिंगण होईल. त्यानंतर आंथुर्णे येथील पालखी तळावर मुक्कामी असेल. २१ जूनला अंथुर्णे येथून शेळगाव फाटा, गोतंडी मार्गे पालखी सोहळा निमगाव केतकी येथे पालखी तळावर मुक्कामी असेल. २२ जूनला निमगाव केतकीहून सोहळा इंदापूरला येईल. इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण होईल. त्यानंतर इंदापूर येथे नव्याने तयार केलेल्या पालखीतळावर सोहळ्याचा मुक्काम आहे. २३ जूनला पालखी सोहळा इंदापूरहून सराटी येथे मुक्कामी पोचेल. २४ जूनला सराटी येथे नीरा स्नान झाल्यानंतर अकलूज येथे माने विद्यालयात आगमन होईल. त्याठिकाणी तिसरे गोलरिंगण होणार आहे. २५ जूनला सोहळा अकलूजहून माळीनगर येथे पोचल्यानंतर तेथे पहिले उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर पालखी सोहळा बोरगाव येथे मुक्कामी आहे.
२६ जूनला दुपारी तोंडले बोंडले येथे सोहळा पोचणार आहे. याठिकाणी पालखी सोहळ्याचा धावा असतो. त्यानंतर पालखी सोहळा पिराची कुरोली येथे मुक्कामी आहे. २७ जूनला पालखी सोहळ्याचे बाघडवस्ती, भंडी शेगावमार्गे बाजीराव विहीर येथे आगमन होईल. त्याठिकाणी दुसरे उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर पालखी सोहळा वाखरी तळावर मुक्कामी असेल. २८ जूनला दुपारी एकनंतर पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. उभे रिंगण झाल्यानंतर पालखी सोहळा पंढरपूरातील नवीन संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी आहे. २९ जूनला आषाढी वारी दिवशी नगरप्रदिक्षणा होईल. ३ जुलै दुपारपर्यत पंढरपूर येथे श्री संत तुकाराम महाराज नवीन मंदिर प्रदक्षिणा मार्ग येथे मुक्कामी आहे. पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास ३ जुलैपासून पंढरपूर ते देहूकडे असणार आहे, असे पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी सांगितले.