पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाचे ई भूमिपूजन
पिंपरी :- पिंपरी मिलेट्री डेअरी फार्म परिसरातील रेल्वे उड्डाणपुलाचे ई भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आकुर्डी येथे करण्यात आले. अशी माहिती माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस याचे हस्ते तसेच पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार आकुर्डी येथील नव्याने विकसित केलेल्या ग.दि.माडगुळकर नाट्यगृह येथे काल दुपारी विविध विकास कामांच्या उद्घाटन व भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे,आमदार महेश लांडगे,आण्णा बनसोडे,उमाताई खापरे,माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे आयुक्त शेखर सिंह तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
कित्येक वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते झाल्याने संपूर्ण पिंपरीकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुमारे ५८,५७,३०,५७७/- ( अठ्ठावन्न कोटी, सत्तावन्न लाख, तीस हजार,पाचशे सत्त्याहत्तर) रुपयांची निविदा असलेल्या मिलेट्री डेअरी फार्म उड्डाणपुलाचे काम मार्गी लागल्याने पिंपरीगाव, रहाटणी,पिंपळे सौदागर, काळेवाडी, साई चौक,व परिसराचा वाहतुकीचा मोठा प्रश्न मार्गी लागून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या उड्डाण पुलामुळे पिंपरी गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून अनेक वर्ष पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले असल्याची भावना संदीप वाघेरे यांनी व्यक्त केली आहे.