सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण
पिंपरी :– मुलांमध्ये विविध कलागुण असतात. या कलागुणांना योग्य वाव मिळाल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. आषाढी एकादशी सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले आहे. अशा उपक्रमामुळे त्यांच्या बालमनावर चांगले संस्कार होतात. या उपक्रमामध्ये सहभाग घेतल्याबद्दल विद्यार्थी आणि त्यांना प्रोत्साहन देणारे पालक यांचे अभिनंदन केले पाहिजे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या वतीने भविष्यातही असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांनी केले. तसेच, त्यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.च्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव बोलत होते. यावेळी कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, विजेते विद्यार्थी, पालक, स्मार्ट सिटीचे कर्मचारी आणि पीसीएमसी स्मार्ट सारथी टीम उपस्थित होते. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक – आराध्या अभय जोगदंड, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी. द्वितीय क्रमांक – स्वराज सचिन भोईटे, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड. तृतीय क्रमांक – प्रिया प्रकाश धायगुडे, गॅलेक्सी स्कूल, दिघी या यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि सुंदरम बुक्स यांचे वतीने शालेय साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर स्पर्धेत ३६४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांची छायाचित्रे पीसीएमसी स्मार्ट सारथी मोबाईल अॅप आणि सोशल मिडीया चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येणार असून सहभागी विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. कार्यक्रमाचे व्यवस्थापन पीसीएमसी स्मार्ट सारथी टीमकडून करण्यात आले.