पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नदी पुनरूज्जीवन प्रकल्पासाठी आपल्या पहिल्या कर्जरोख्याद्वारे यशस्वीरित्या २०० कोटी रुपये मिळविले आहेत. या प्रकल्पासाठी गुंतवणूकदारांकडून ३१५ कोटी रुपयांच्या बोलीसह उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातंर्गत वाकड बायपास ते सांगवी पुलापर्यंत मुळा नदीच्या विकासासाठी हा निधी खर्च करण्याची महापालिकेची योजना आहे.
चालू आर्थिक वर्षातील देशातील महानगरपालिकेमार्फत काढण्यात येणारे हे पहिलेच कर्जरोखी आहे. यापुर्वीचे कर्जरोखे इंदूर महानगरपालिकेने फेब्रुवारी २०२३ मध्ये ८.२५ टक्के दराने जारी केले होते. महानगरपालिकेने आज ८.१५ टक्केच्या दरावर २०० कोटी रुपयांची रक्कम कर्जरोख्याद्वारे जारी केली. यामुळे केंद्र सरकारकडून २६ कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यास महापालिका पात्र ठरली आहे.
यावेळी आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सदर कर्जरोख्यामुळे उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन, शहरी पायाभूत सुविधांवरील मागणी वाढत असताना महानगरपालिकांना वित्त पुरवठ्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आगामी काळामध्ये कर्जरोखे महत्वपुर्ण ठरतील. महापालिकेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे म्हणाले, महापालिकेचे उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन व आर्थिक शिस्त यामुळे सदरचे कर्जरोखे यशस्वीरित्या उभारण्यास मदत झाली आहे. तसेच सदरच्या कर्जरोख्यामुळे प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी नवीन पर्यायी मार्ग खुले होत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, महापालिकेला क्रिसील तसेच केअर या पतमानांकन संस्थांकडून AA+/Stable रेटिंग मिळाले आहे.
• महापालिकेने गुरुवारी कर्जरोख्याद्वारे २०० कोटी रुपये उभे केले आहेत. या कर्जरोख्याला गुंतवणूकदारांकडून ३१५ कोटी रुपयांच्या बोलीसह जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
• सदर कर्जरोख्याला १.५८ पट अधिक मागणी नोंदविली गेली.
• नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत वाकड बायपास ते सांगवी पुलापर्यंत मुळा नदीच्या विकासासाठी हा निधी खर्च करण्याची महापालिका योजना आखत आहे.
• कर्जरोख्यामुळे वित्तपुरवठ्याचा एक नवीन स्रोत निर्माण झाला आहे.
• महापालिकेने आपले पहिले कर्जरोखे जारी केल्यामुळे केंद्र सरकारकडून २६ कोटी. रुपयांचा प्रोत्साहनपर निधी मिळण्यास महापालिका पात्र ठरली आहे.
• या कर्जरोख्यामुळे महापालिका राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारात वेगळे स्थान निर्माण करेल.