इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्डमध्ये पिंपरी चिंचवड स्मार्ट सारथी अॅप देशात दुसरे तर राज्यात प्रथम
पिंपरी :- भारत सरकारच्या इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्डमध्ये “गव्हर्नन्स” श्रेणीत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या स्मार्ट सारथी अॅपने देशात दुसरे स्थान पटकाविले. याबद्दल इंदौर (मध्यप्रदेश) येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांना सन्मान चिन्ह व पुरस्कार प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, स्मार्ट सारथी अॅप प्रकल्प प्रमुख अंकीत भार्गव हे देखील उपस्थित होते.
इंदौर (मध्यप्रदेश) येथे बुधवार, दि. २७ सप्टेंबर रोजी इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्ड कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, राज्यपाल मंगुभाई पटेल, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे (MoHUA) सचिव मनोज जोशी, भारत सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनचे सहसचिव आणि मिशन संचालक कुणाल कुमार यांच्यासह विविध स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विविध मान्यवर उपस्थित होते. देशभरातील ८० पात्रताधारक शहरांमधून पिंपरी चिंचवडला “गव्हर्नन्स” पुरस्कार प्राप्त झाला आहे. पिंपरी चिंचवडने देश पातळीवरील दुसरे तर राज्यात पहिल्या क्रमांकाचे यश संपादन केले. हे यश म्हणजे पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी एक गौरवाची बाब असून पुन्हा एकदा शहराच्या लौकीकात मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशी भावना आयुक्त शेखर सिंह यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्त केली.
इंदौर येथील इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्ड कार्यक्रमात पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीमार्फत सूरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती देण्यासाठी स्टॉल उभारण्यात आला होता. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सूरू असलेल्या प्रकल्पांची माहिती घेतली. आयुक्त शेखर सिंह यांनी व्हिडीओ चित्रफितीद्वारे प्रकल्पांचे सादरीकरण केले. यावेळी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, स्मार्ट सारथीचे बिनिश सुरेंद्रन, आशिष चिकणे, किरण लवटे यांनी पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधीत्व केले.
पिंपरी चिंचवड “स्मार्ट सारथी ऍप” हा एक दूरदर्शी डिजिटल उपक्रम आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथी प्लॅटफॉर्मद्वारे ई-गव्हर्नन्सचा वापर तसेच नागरिक सहभाग वाढविण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करत आहे. सध्या सुमारे २ लाखांहून अधिक नागरिक अॅप, वेब पोर्टल आणि सोशल मीडिया चॅनेलद्वारे संवाद साधत आहेत. विविध उपक्रमांमध्ये नागरिकांच्या सहभागासाठी पुढाकार, उपयुक्तता अद्यतने, महापालिकेचा ऑनलाइन कर भरणा, ऑनलाईन विवाह नोंद, जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र सुविधा, नागरवस्ती योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा, आयडीचा वापर करून नागरिकांच्या सोयीसाठी तक्रार निवारण यंत्रणा, महापालिका कार्यालये शोधण्यासाठी “जीपीएस”चा वापर, आपत्कालीन वेळेत संपर्क साधण्यासाठी मदत कार्य, स्थानिक अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पुढाकार, वेबिनारचे आयोजन, महापालिका आरोग्य अभियानांची माहिती, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी, विकास प्रकल्पांची माहिती, ब्लॉग लेखन यासह कोरोनाच्या प्रादुर्भावापासून नागरिकांचे संरक्षण तसेच नागरिकांच्या कल्याणासाठी या ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. महापालिका शाळांचा स्तर वाढविण्यासाठी देखील स्मार्ट सारथी ऍपचा वापर केला जात आहे. या दूरदर्शी लोकोपयोगी डिजिटल उपक्रमाने देशभरात आपली छाप पाडली असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
देशातील १०० स्मार्ट शहरांनी गतिशीलता, ऊर्जा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक जागा, सामाजिक पायाभूत सुविधा आणि स्मार्ट गव्हर्नन्सचे विस्तृत प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी स्मार्ट सिटीज मिशनअंतर्गत इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड कॉन्टेस्ट (ISAC) हा उपक्रम राबविण्यात येतो. देशभरातील ८० पात्रताधारक स्मार्ट शहरांमधून, इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड कॉन्टेस्ट (ISAC) २०२२ ला एकूण ८४५ नामांकन मिळाले होते. पाच मूल्यमापन टप्प्यांतून, विविध पुरस्कार श्रेणींमध्ये ६६ विजेते या पुरस्कारासाठी पात्र ठरले. यामध्ये, प्रोजेक्ट अवॉर्ड ३५, इनोव्हेशन अवॉर्ड ६, राष्ट्रीय/झोनल सिटी अवॉर्ड १३, राज्य/ केंद्रशासित प्रदेशातील ५ आणि भागीदार पुरस्कार श्रेणीतील ७ विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. १० थीम्ससह प्रोजेक्ट अवॉर्ड्स, २ थीम्ससह इनोव्हेशन अॅवॉर्ड्स, नॅशनल/ झोनल सिटी अॅवॉर्ड्स, स्टेट अॅवॉर्ड्स, यूटी अॅवॉर्ड आणि ३ थीम्ससह पार्टनर अॅवॉर्ड्सचा यामध्ये समावेश आहे.
स्मार्ट सिटीज मिशन नाविन्यपूर्ण “स्मार्ट सोल्यूशन्स”द्वारे शहरातील नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा, स्वच्छ आणि टिकाऊ वातावरण आणि सुधारित जीवनमान प्रदान करून शहरी विकास पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहे. शहरी विकासात एक आदर्श बदल साध्य करण्याच्या ध्येयाकडे या मिनशद्वारे महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशासनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. सध्या सुमारे २ लाख वापरकर्ते अॅप, वेब पोर्टल आणि सोशल मीडिया चॅनेलद्वारे संवाद साधत आहेत. पिंपरी चिंचवडने देश पातळीवरील दुसरा तर राज्यात पहिला क्रमांकाच्या पुरस्कारासाठी नाव कोरल्याने शहरवासियांसाठी ही एक गौरवाची बाब असून पुन्हा एकदा शहराच्या लौकीकात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, विविध संस्था आणि प्रशासनाच्या सहभागामुळेच असे यश प्राप्त होत आहे. यापुढेही हे सहकार्य मिळत राहील असा आशावाद देखील आयुक्त सिंह यांनी व्यक्त केला.
– शेखर सिंह, आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी.