अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्याचे प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे कार्य उल्लेखनीय : – साक्री विधानसभेच्या विद्यमान आमदार मंजुळाताई गावित
दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेत ४० हून अधिक शाळांचा सहभाग
साक्री :- दृष्टिकोनाविना कृती म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. कृतीला ज्ञानाची जोड दिल्यास तुमचं आयुष्य बदलू शकते हे आपल्या कृतीद्वारे संपूर्ण साक्री तालुक्याला शालेय तसेच सहशालेय कार्यक्रमाद्वारे प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजने अनेक वेळा सिद्ध केले आहे. अशा उल्लेखनीय कार्यातून प्रचिती स्कूलने आपले नावलौकिक मिळविले आहे, असे मत साक्री विधानसभेच्या आमदार मंजुळताई गावित यांनी व्यक्त केले. १४, १७ व १९ वयोगटातील मुला- मुलींसाठी तालुकास्तरीय शासकीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन दि. २९, ३० सप्टें.२०२३ रोजी साक्री विधानसभेच्या विद्यमान आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. खेळाडूंमधला उत्साह, खेळाच्या स्पर्धा सुरू होण्यापूर्वीची वाढती उत्कंठा आणि क्रीडा ज्योतीच्या आगमनाने भारलेल्या वातावरणात कौतुकास्पद समन्वयाचा अनुभव देणाऱ्या क्रीडा स्पर्धांचे आज उद्घाटन झाले. मोबाईल आणि संगणकाच्या युगात आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. मुलांना शालेय जीवनापासून मैदानी खेळासाठी वेळ दिला पाहिजे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्वाचा आहे. यासाठी प्रचिती शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. असेही त्या म्हणाल्या. क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, धुळे जिल्हा अधिकारी कार्यालय, साक्री तालुका क्रीडा महासंघ, साक्री तालुका क्रीडा संकुल व प्रचिती इंटरनॅशनल स्कूल आणि ज्यू.कॉलेज साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी राकेश साळुंखे (माध्य. शिक्षण अधिकारी, धुळे), अविनाश टिळे (जिल्हा क्रीडा अधिकारी), राजेन्द्र पगारे (गट शिक्षण अधिकारी, धुळे), विजय पवार (शिक्षण विस्तार अधिकारी, साक्री), एम. के पाटील (क्रीडा अधिकारी, साक्री), अजय सोनवणे (लोकनियुक्त सरपंच, भाडणे), विकास देसले (ज्येष्ठ क्रीडा शिक्षक), संजय भामरे (अध्यक्ष, शा. शि.महासंघ, साक्री), धनंजय घरटे (सचिव, शा. शि. महासंघ, साक्री), महेश मराठे (सचिव, संयोजन समिती, साक्री), मार्गदर्शक धनंजय सोनवणे (तालुका क्रीडा संकुल), अनिल पाटील (तालुका क्रीडा संकुल), प्रमोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन झाल्यानंतर खेळाडूंच्या पथकाने क्रीडा ज्योतद्वारे मैदानात दीप प्रज्वलन करून क्रीडा स्पर्धा सुरू झाल्याची घोषणा केली. छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाच्या निनादात सुरू झालेल्या लेझिमच्या खेळाने वातावरणात उत्सवी रंग भरला.
दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत प्रचिती स्कूल बरोबरच तालुक्यातील ४० शाळांमधील २०० मुली ३०० मुले सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील म्हणाले की, क्रीडा स्पर्धेत दरवर्षी वाढत असलेला उत्साह, विजय आणि आनंद ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. खेळांमुळे शारीरिक क्षमतेच्या विकासाबरोबरच व्यक्तिमत्वाचाही विकास होत असल्याने खेळातील यश आणि अपयशाकडे सकारात्मकतेने बघण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतांना आमदार मंजुळाताई गावित म्हणाल्या की, प्रचिती शाळेमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांचा सर्वांगीण विकास केला जातो. विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुण विकसित होण्यासाठी अशा आयोजनाचा मोठा हातभार लागतो. मुलांच्या शारीरिक, सामाजिक, मानसिक आणि बौद्धिक वाढ होण्यास खेळ फार उपयुक्त ठरतात. मुलांच्या आयुष्यात अभ्यासा इतकेच खेळाचे महत्व आहे. सांघिक खेळांमुळे संघभावना वाढीस लागते. अभ्यास आणि इतर कामांमुळे ताण आला असेल तर खेळांमुळे कल्पक्तेचा विकास होतो. खेळ आणि यश अपयश याचा सामना करण्यास शिकवतो. खेळामुळे मुलांच्या मानसिक विकासाला गती मिळते.
सलामीला गोळा फेकचा सामना घेण्यात आला. स्पर्धेत १४, १७ व १९ वयोगटात १००, २००, ४००, ६०० मीटर धावणे, ८० मीटर हर्डल्स, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, थाळी फेक, ४×१० मीटर रीले, तिहेरी उडी, बांबू उडी, क्रॉस कंट्री, हातोडा फेक इ. मैदानी खेळ घेण्यात आले.
कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे, क्रीडा शिक्षक कुणाल देवरे, अमोल अहिरे, अर्जुन राऊत, राकेश चौरे, राकेश मोरे, राज देवरे, दगडू ठाकरे, अशोक सोनवणे, बाळासाहेब गायकवाड, जयेश खैरनार, तुषार सूर्यवंशी, प्रफुल साळुंके, असिन तडवी, सुभाष अहिरराव, अमोल चौरे, महेश भवरे, बाळकृष्ण तोरवणे तसेच सुभाष पाटील, यशपाल देसले, गोटू राऊत, मंगळू मालचे यांनी संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना देवरे, पाहुण्यांचा परिचय स्मिता नेरकर, वैष्णवी थोरात यांनी केले.