फराळ व कपड्यांचे वाटप करून दीपावली साजरी
साक्री : दीपावलीनिमित्त प्रचिती इंटरनॅशनल स्कूलतर्फे साक्री व कावठे येथील आदिवासी बांधवांना तसेच गरजूंना फराळ व कपड्यांचे वाटप करून गोड दिवाळी साजरी करण्यात आली. शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे, कार्यक्रमाच्या संयोजिका स्मिता नेरकर आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी, वासूबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज अशा पाच वेगवेगळ्या सणांच्या आरास सजावट करून पूजा करण्यात आली. शाळेच्या शिक्षिका मनीषा बोरसे यांनी वसुबारस विषयी माहिती दिली. या दिवशी गाईची पाडवासह पूजा केली जाते. गोमातेची उपयुक्तता ओळखूनच तिची पूजा केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. अश्विन कृ. त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात. या दिवशी धनाची व आयुर्वेदिक औषधीची पूजा केली जाते. धन्वंतरी आरोग्याचे देवता असून या देवतेचे स्मरण करून पूजा करावी. त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते, अशी माहिती देवका चव्हाण यांनी विशद केली. नरक चतुर्दशीला सर्व लोक पहाटे उठून सुवासिक तेल, उटणे लावून गरम पाण्याने स्नान करतात. घरात सगळीकडे दिवे लावतात. घर प्रकाशाने उजळून टाकतात, असे तेजस्विनी घरटे यांनी सांगितले. घरोघरी लक्ष्मीपूजन श्री लक्ष्मीचे स्वागत होते. या दिवशी बलिच्या बंदीवासातून लक्ष्मीची सुटका झाली. त्यामुळे सर्वांना आनंद झाला. तिचे वास्तव्य आपल्या घरात कायमचे राहावे. त्यासाठी सर्वजण तिची मोठ्या भक्ती भावाने पूजा करतात. बलिप्रतिपदेस व्यापारी पाडवा असे संबोधले जाते. व्यापारी याच दिवशी जमा खर्चाच्या वह्यांची पूजा करतात, असे प्रभावती चौधरी यांनी सांगितले. भाऊ बहिणीच्या प्रेमाचा दिवस म्हणजे भाऊबीज. बहीण भावाला ओवाळते व भाऊ बहिणीला अलंकार किंवा पैसे देतो, अशी माहिती अश्विनी ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
याप्रसंगी इयत्ता दुसरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी “मेरे घर राम आये है” या गाण्यावर नृत्य सादर केले. यासाठी रोहिणी सोनवणे, गीतांजली काकुस्ते यांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर, साक्री व कावठे येथील आदिवासी बांधवांना व गरजूंना दिवाळी फराळाचे व कपड्यांचे वाटप करण्यात आले. यासाठी गोविंदा सोनवणे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सपना देवरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी फुलांची आरास, हंडी सजावट, आकाश कंदील, दिवे सजावट यासाठी वैष्णवी देवरे, वैष्णवी थोरात, सायली मॅम यांनी मार्गदर्शन केले. सुंदर रांगोळी रेखाटन सविता लाडे, दीपमाला यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन स्मिता नेरकर, श्रावण अहिरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.





