पिंपरी : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि., महानगरपालिका आणि रिलायन्स स्मार्ट बाजार यांच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावा, या उददेश्याने वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे.
लहान मुलांमध्ये विविध कलागुण असतात. या कलागुणांना योग्य वाव मिळाल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. तसेच अशा उपक्रमांमुळे मुलांच्या बालमनावर चांगले संस्कार होण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत एक हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या वर्षी देखील स्पर्धेचे व्यापक स्तरावर आयोजन करण्यात आले आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी, संत, वारकरी यांच्या पारंपरिक वेशभूषा करणे अपेक्षित आहे. स्पर्धेसाठी केवळ पीसीएमसी स्मार्ट सारथी मोबाईल अॅपच्या माध्यमातून आलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरण्यात येणार आहे. वेशभूषा पर्यावरणपूरक घटकांपासून बनवलेली असावी. तसेच वेशभूषेमध्ये आक्षेपार्ह बाबी असू नयेत. स्पर्धकांना दि. १७ जुलै २०२४ पर्यंत नोंदणी करता येणार आहे.
आषाढी एकादशी सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेमध्ये इयत्ता दुसरी ते चौथी, इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी असे गट असणार आहेत. स्पर्धेमध्ये गटानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेची माहिती पीसीएमसी स्मार्ट सारथी मोबाईल अॅप आणि पीसीएमसी स्मार्ट सारथी सोशल मिडिया चॅनेलवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी https://fxurl.co/uBUNs या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.