- प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक टपाल दिवस अनोख्या पद्धतीने साजरा
साक्री – प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये ९ ऑक्टोंबर जागतिक टपाल दिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रसंगी, इयत्ता ३ ते ८ वी या वर्गांची पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली. सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे असून सर्वत्र इंटरनेटचे (Internet) वर्चस्व आहे. १९९० च्या दशकात आलेल्या या इंटरनेट सेवेमुळे १२० वर्षांपासून सुरू असलेली टपाल व्यवस्था संपुष्टात येईल, असे भाकीत केले जात होते. इंटरनेटमुळे संवादाची परिभाषा बदलली असली तरी टपाल व्यवस्था मात्र संपलेली नाही. इंटरनेटच्या या युगात आजही पोस्टाचे महत्त्व कायम आहे. जगभरात ९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. पत्रलेखन ही एक कला आहे आणि आजच्या या मोबाईल , फॅक्स, ई-मेल तसेच संवाद साधण्याचे किंवा संदेश पाठवण्याच्या आजच्या जलद व क्रांतिकारी साधनांमुळे ही कला मागे पडत चाललेली आहे. याचेच महत्व विद्यार्थ्यांना समजविण्यासाठी प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाने इयत्ता ३ री ते इ. ८ वी च्या वर्गांची पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त भाग घेतला. स्पर्धेत विद्यार्थ्यांना एक साधे पोस्ट कार्ड देण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपले आई वडील , आजी – बाबा , भाऊ – बहीण तसेच इतर नातेवाईक यांना स्वतःच्या निरागस भावनेतून पत्र लिहिले. यासाठी त्यांना शाळेच्या शिक्षकांनी पत्र लेखनाचे मार्गदर्शन करण्यात आले. 9 ऑगस्ट जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधत साक्री पोस्ट ऑफिसचे तालुका पोस्ट निरीक्षक भरत चौधरी तसेच बंडू कोळेकर ( पोस्टमॅन) यांनी शाळेला भेट दिली. त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी इयत्ता नर्सरीचा विद्यार्थी शिव सोनवणे याने पोस्टमन काकांची वेशभूषा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पत्रलेखन व टपाल व्यवस्था याविषयी माहिती देताना शाळेच्या शिक्षिका श्रीमती स्मिता नेरकर यांनी सांगितले की, खूप वर्षांपूर्वी जेव्हा माणसांना लेखन कला अवगत नव्हती किंवा संदेश पाठवण्याची इतर साधने उपलब्ध नव्हते. तेव्हा कबुतराद्वारे संदेश पाठवले जात किंवा राजांचे धुत त्यांच्या संदेश घेऊन जात. भारतात टपाल व्यवस्थेची सुरुवात इंग्रज गव्हर्नर वॉरन हेस्टिंग्ज यांनी सन १७७४ या वर्षी सुरु केली अशी महत्त्वपूर्ण माहिती दिली. यानंतर शाळेचे क्लर्क ससले भाऊसाहेब यांनी पोस्टमन काकांची वेशभूषा करत सायकलीवरून विद्यार्थ्यांमध्ये जात डाकिया डाक लाया… खुशियों का पैगाम लाया… या गीतावर विद्यार्थी शिक्षक मावश्या यांच्यामध्ये पत्र वाटप केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपली भारतीय टपाल व्यवस्था व पोस्टमन काका यांच्या आठवणी जाग्या झाल्या व पोस्टमन काका विषयी आदर , प्रेम व आपुलकीच्या भावना जाग्या झाल्या. कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे , उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, शाळेचे समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.