प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा : दांडिया – गरबा नृत्यावर थिरकले विद्यार्थी
साक्री :- प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री येथे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा सणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत पाटिल साहेब यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, उप – प्राचार्य घनश्याम सोनवणे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे तसेच कार्यक्रमाचे संयोजक तुषार सूर्यवंशी व मनीषा बोरसे यांच्या हस्ते सरस्वती व दुर्गा मातेच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक जितेंद्र राजपूत म्हणाले की, दसरा हा सण भारतातील साडेतीन मुहूर्तांपैकी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा एक सण आहे. या दिवशी देवी दुर्गाने महिषासुर या म्हशीच्या राक्षसावर विजय मिळवून धर्माचे रक्षण केले होते. उत्तर, मध्य आणि पश्चिम राज्यांमध्ये, या सणाला दसरा म्हणतात (तसेच याला दशहरा देखील म्हणतात). या प्रदेशांमध्ये, या सणाला रामलीलाची समाप्ती होते आणि देव रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण केले जाते.हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच ‘दसरा’, ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात. असे त्यांनी सांगितले व भाषणातून सपना ठाकरे यांनी सांगितले कि ,‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. या दिवशी सरस्वतीपूजन व शस्त्रपूजन केले जाते. दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला. प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले. पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता ज्या वेळी विराटच्या घरी गेले, त्या वेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली, तो हाच दिवस.

शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत. दसरा म्हणजेच विजयादशमी . हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस. फार वर्षांपूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्याभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत. अभ्यास करून मोठे होत. त्या वेळी मानधन किंवा फी नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत. वरतंतू या ऋषींकडे ‘कौत्स’ नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने ऋषींना विचारले कि, “मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ ? तुम्ही मागाल ते मी देईन. ” ऋषींनी कौत्साची परीक्षा घ्यावयाचे ठरविले. त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा, याप्रमाणे १४ विद्यांबद्दल १४ कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितल्या.

कौत्स हे ऐकून गांगरून गेला. तो रघुराजाकडे गेला. परंतु राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता, तरीसुद्धा राजाने कौत्साकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहित होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याच्या पानांची, सोन्याची नाणी बनवून, ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली.

कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन, वरतंतू ऋषींकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी त्यापैकी १४ कोटी सुवर्णमुद्रा परत घेण्यास सांगितले.राजाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून, लोकांना लुटायला सांगितल्या. लोकानीं त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता. म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरु झाली.
“साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा !” या तुकाराम महाराजांच्या उक्तीत दोन सणांचा अजोड असा उल्लेख केला आहे व तो योग्यच आहे.अशी महत्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दसरा या सणाबद्दल दिली. यानंतर नवरात्रोत्सव पर्वा निमित्त इयत्ता ५ वी व ६ वी मधील विद्यार्थिनींनी नवदुर्गा मातांची वेशभूषा साकारून नृत्य सादर करत महिषासुरवधाचे आकर्षक नाट्य सादर केले व त्यानंतर इ. ६ वी मधील अथर्व गव्हाळे व विभूती साळुंखे आणि इ. ५ वी मधील गौरव रामोळे या विद्यार्थ्यांनी राम, सीता व लक्ष्मण यांची वेशभूषा साकारून सियावर रामचंद्र की जय…. या घोषणांचा आवाजात प्रभू रामांच्या आयोध्या आगमनाचे दृश्य साकार केले. दांडियाचे आयोजन शाळेतर्फे करण्यात आले. यात विद्यार्थिनींनी घागरा – चोली व विद्यार्थ्यांनी दांडियाच्या पोशाख करीत विद्यार्थी गरबा नृत्यावर थिरकले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये एक आगळावेगळा उत्साह व आनंद दिसत होता. गरबा नृत्याचे संयोजन व मार्गदर्शन गीतांजली काकुस्ते, पुनम पवार यांनी केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी माणसातील षडरिपू (सहा शत्रू )- काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या दुर्गुणांचे दहन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
” मराठी अस्मितेची मराठी शान , मराठी परंपरेचा मराठी मान आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल.आयुष्यात तुमच्या सुख , समृद्धी आणि समाधान”
याच दसरा सणाच्या सोनेरी शुभेच्छा प्रचिती इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने जितेंद्र राजपूत सर यांनी सूत्रसंचालनातून शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात नवदुर्गा नृत्याचे संयोजन हिरल सोनवणे व हेमांगी बोरसे यांनी केले. राम सीता लक्ष्मण संयोजन वैशाली खैरनार यांनी केले. उत्तम सजावट व इतर आवश्यक साहित्याची निर्मिती शाळेचे कलाशिक्षक भूपेंद्र साळुंखे व किरण गवळी, दीपमाला अहिरराव मॅडम यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र राजपूत सर यांनी केले. तसेच कार्यक्रम उत्तम रीतीने पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे संयोजन तुषार सूर्यवंशी व मनीषा बोरसे यांनी केले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.


















