साक्री :- मुंबई उच्च न्यायालयांच्या धुळे जिल्हा प्रमुख न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या आदेशान्वये तसेच न्यायाधीश संदीप स्वामी, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे व न्यायाधीश मुग्धा गांगुर्डे, अध्यक्ष, साक्री तालुका विधी सेवा समिती तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, साक्री यांचे मार्गदर्शनाखाली १४ नोव्हेंबर रोजी बाल हक्क सप्ताहाचे औचित्य साधुन प्रचिती इंटरनॅशनल स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, साक्री येथे विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्या वैशाली लाडे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश निलेश पाटील, साक्री तालुका वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. योगेश कासार, अॅड. वनिता खैरनार, अॅड. ज्योती सुर्यवंशी उपस्थित होते. तसेच ए.एस.आय साजिद सैय्यद, न्यायालयीन कर्मचारी अमोल सावळे, अनिल गायकवाड, प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक व शिक्षकतेर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक अॅड. कासार यांनी केले. अॅड. वनिता भामरे यांनी मुलींसाठी असलेल्या कायद्यांविषयी माहिती दिली. यावेळी न्यायाधीश श्री. पाटील यांनी बालदिनाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवुन सत्कार केला. न्यायाधीश निलेश पाटील यांनी उपस्थितांना शिक्षण हमी कायदा, बाल मजुर कायदा, कौटुंबिक हिंसाचार कायदा व पॉक्सो अॅक्ट विषयी माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना शालेय जीवनात आवश्यक कायद्यांचे महत्व पटवून दिले. तसेच विविध कायद्यांबाबत व मोफत विधी सेवा विषयक माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी आपले हक्क व अधिकार जानून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या वैशाली लाडे यांनी मान्यवरांनी केलेल्या मागर्दशनाबद्दल आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. बालदिनाविषयी जितेंद्र राजपूत यांनी सांगितले की, बालदिन हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. ज्यांना मुलांनी ‘चाचा नेहरू’ म्हणून संबोधले होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला. बालदिन किंवा ‘बाल दिवस’ भारतात दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. मुलांवरील त्यांचं अपार प्रेम पाहता हा दिवस त्यांच्या जयंतीनिमित्तानं भारतात ‘बालदिन’ म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.पंडित नेहरूंना मुलांविषयी वाटणार्या प्रेम आणि जिव्हाळ्याविषयी आदर व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे. खरंतर बालकांसाठी प्रत्येक दिवस हा खास आणि आनंददायी असतो. मात्र, या दिवशी लहान मुलं आपला आनंद इतरांबरोबर अधिक उत्साहीपणे साजरा करतात.
श्रावण अहिरे, सपना ठाकरे यांनी बालदिनावर आधारीत प्रश्नमंजुषा आयोजित केली. त्यात विविध प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे देऊन विविध बक्षिसे जिंकली. या प्रश्नोत्तर स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ प्रतिसाद दिला. त्यानंतर कठपुतली कलाकार उत्तमराव भट्ट यांनी कठपुतलीचे विविध खेळ विद्यार्थ्यांनपुढे सादर केले. या सादरीकरणातून बेटी बचाव बेटी पढाव, पर्यावरण,- प्रदूषण , स्वच्छ भारत अभियान याविषयी संदेश दिला. या कार्यक्रमाचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. त्यानंतर बालदिनानिमित्त इयत्ता नर्सरी ते इयत्ता १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून , सुंदर अशा चित्रांची रंगरंगोटी केली. तसेच नर्सरी ते इ.१ ली च्या विद्यार्थ्यांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा पार पडली. तसेच, सर्व शिक्षकांनी सामूहिक नृत्य सादर केले. सर्व विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्राचार्या वैशाली लाडे, उप – प्राचार्य घनश्याम सोनवणे सर , शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे व सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन मनीषा बोरसे, जितेंद्र राजपूत, वैष्णवी देवरे, हिरल सोनवणे , प्रभावती चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा बोरसे यांनी केले.