सत्ताधारी भाजप व महापालिका प्रशासनाचा निषेध
हेच का अच्छे दिन? नगरसेवक मयुर कलाटे यांचा भाजपवर निशाणा
पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. त्याचे लोण सर्वत्र शहरात पसरले असतानाही वाकडसारख्या उपनगरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसरातील उच्चभ्रू सोसायटीतील नागरिकांनी ‘NO WATER NO VOTE’ (पाणी नाही तर, मतदान नाही) अशा आशयाचा फलक परिसरात लावत सत्ताधारी भाजप व महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. वाकड प्रभाग क्रमांक २५ मधील हिंजवडी रोड, सौंदर्या हॉटेलच्या शेजारील सोसायटीतील नागरिकांनी हे फलक लावले आहेत.
आम्ही कर भरतो, मग आम्हाला पाणी का नाही…
फलकावर म्हटले आहे की, आम्ही महापालिकेला कर भरतो. तरी आम्हाला पाणी मिळत नाही. बाहेरून टँकरद्वारे पाणी घ्यावे लागते. त्याचा खर्च आम्हालाच करावा लागतो. त्यामुळे आम्ही सर्व रहिवाशांनी ‘पाणी नाही तर मत नाही’ असा आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. याबाबत नगरसेवक मयूर कलाटे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत पिं. चिं. मनपाचा सर्वांगीण विकास करत असताना आम्ही त्यात यशस्वीही झालो. पण मागील मनपाच्या निवडणुकीमध्ये आताच्या सत्ताधारी पक्षाच्या भुलथापांना बळी पडुन सत्ता हस्तगत केली. आज केंद्रात आणि राज्यात भाजप शिवसेना युतीची सत्ता असतानासुद्धा नागरिकांचे हे प्रश्न का सोडवले गेले नाहित? मग हेच का तुमचे अच्छे दिन ? हीच का स्मार्ट सिटी.? धरणामध्ये पाणीसाठा भरपुर प्रमाणात आहे तरी नागरिकांना पाणी का नाही? याचे उत्तर सत्तेत असणार्या युतीच्या भाजप-शिवसेना पदाधिकार्यानी द्यावे.
आता पाण्यासाठी आंदोलने…
नागरिक मोठ्या प्रमाणात टॅक्स भरत असतानाही त्यांना पाण्यासाठी बॅनर लावून ‘पाणी नाही तर मतदान नाही, ही भूमिका घ्यावी लागत असेल तर या सारखे दुसरे दुर्दैव कोणतेच नाही. आम्ही विरोधी पक्षात असुन जनतेच्या प्रश्नासाठी अतोनात लढत आहोत. शहराला मुबलक व व्यवस्थित पाणी पुरवठा व्हावा, यासाठी वेळोवेळी आंदोलने करीत आहोत. आणि येथुन पुढेही जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहु, असे कलाटे यांनी म्हटले आहे.