कॉंग्रेसचा पिंपरी विधानसभेसाठी रविवारी प्रचार शुभारंभ
पिंपरी : ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघापैकी पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा कॉंग्रेससाठी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरु आहे. जागा वाटप होण्यात विलंब होत असल्यामुळे वरिष्ठांचे आदेश येईपर्यंत वेळ वाया न घालवता पिंपरी विधानसभेसाठी रविवारी कॉंग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याचे पिंपरी चिंचवड शहर असंघटीत कामगार कॉंग्रेसचे अध्यक्ष सुंदर कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
असंघटीत कामगार कॉंग्रसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बुधवारी (दि. 24) पिंपरीतील कार्यालयात बैठक झाली. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मागणी केली की पिंपरी राखीव मतदारसंघातून सुंदर कांबळे यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवावी.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुंदर कांबळे म्हणाले की, 2012 ते 2017 या कालावधीत महानगरपालिकेत कॉंग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून होता. तर राज्यात आणि केंद्रात कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर आघाडी केली होती. पिंपरी चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे लाखो मतदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसला देण्यात आला होता. या निवडणुकीत पिंपरी राखीव मतदारसंघ कॉंग्रेसला मिळावा ही शहरातील सर्व कॉंग्रेसप्रेमींची मुख्य मागणी आहे. कॉंग्रेस श्रेष्ठींनी शहरातील कॉंग्रेसच्या मतदारांचा आदर राखून पुढील काळात कॉंग्रेस पक्ष वाढविण्याच्या उद्देशाने पिंपरी विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसला घेणे संयुक्तीक ठरेल. शहरातील सर्व ज्येष्ठ, युवक आणि महिला कार्यकर्त्यांची मागणी विचारात घेऊन पिंपरी विधानसभेसाठी कॉंग्रेसच्या प्रचाराचा कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा व शहराध्यक्षांच्या उपस्थितीत शुभारंभ करू. प्रचाराच्या या शुभारंभ कार्यक्रमास शहरातील कॉंग्रेसच्या सर्व सेलच्या पदाधिकारी, सर्व महिला कार्यकर्त्यांनी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे रविवारी (दि. 29) सकाळी 10.30 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन असंघटीत कामगार कॉंग्रसचे अध्यक्ष सुंदर कांबळे यांनी केले.