मीरारोड येथील न्यू म्हाडा गृहसंकुल ४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सवात साक्षरता, स्वच्छता, पर्यावरण आणि मुलींचे रक्षण या चार मुद्द्यावर जनजागृती करत आहे. यासाठी चलचित्र आणि सोशल मेसेजचा वापर जास्तीत जास्त केला जातोय. गणेश मुर्तीही कागदी लगद्यापासून तयार केली असुन ती अधिक खुबीने सजविली आहे. मंडपातील सजावटही कागद, लाकूड याचा वापर करुनच केलीय. बाप्पाला प्रसाद म्हणून वही आणि पेन म्हणुन स्विकारला जातोय. ते जमा करुन गरजू विद्यार्थांना दिले जाणार आहे. तसेच गृहसंकुलासह आजुबाजूच्या परिसरात स्वच्छता व मुलींच्या सुरक्षतेची माहिती सजावटीद्वारे दिली जात आहे.
एकता युवा मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण पोषक सजावट केली आहे. गणेशमुर्तीच्या सभोवताली झाडांच्या पानांच्या १० हजारांहून अधिक पंत्रावळ्या व छतावरून खाली वडाच्या पारंब्या सोडण्यात आल्या आहेत. मंडपातील उष्ण वातावरणामुळे सजावटीवर परिणाम होऊ नये, यासाठी वातानुकूलित यंत्रांद्वारे गारवा निर्माण करण्यात आला आहे.
श्री श्रद्धा सबुरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने नेहमीप्रमाणे परदेशातील मुर्तीची परंपरा कायम ठेऊन यंदा जपानच्या टोकीयो येथील मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. हि मुर्ती शाडूच्या मातीने तयार केली आहे.
श्री भक्ति सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा आधुनिक व यांत्रिक युगात व्यस्त झालेल्या लहान मुलांतील लहानपण आठवून देण्याचा प्रयत्न देखाव्यातुन केला आहे. त्याला साजेशी गणेशमुर्तीसुद्धा हातावर भोवरा फिरवून प्रत्येक भक्ताला लहानपणातील मातीतल्या खेळाची आठवण करून देत आहे.
जय अंबे सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाने यंदा जेम्स या गोड खाऊच्या सुमारे दिड लाख गोळ्यांची गणेशमुर्ती साकारली आहे.