मनदीपसिंग आणि कर्णधार मनीष पांडेच्या अर्धशतकानंतर यजुवेंद्र चहलच्या अचूक फिरकीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने रविवारी ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघावर ५७ धावांनी मात केली आणि चौरंगी वन-डे क्रिकेट मालिकेचे विजेतेपद पटकावले. भारताने दिलेल्या २६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ ४४.५ षटकांत २०९ धावांत गारद झाला.

भारताचा कर्णधार मनीष पांडेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाच्या दुसऱ्याच षटकात डॅनिएल वॉरेलने करुण नायरला बाद केले. यानंतर मनदीपसिंग आणि श्रेयस अय्यर जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. अय्यर ६४ चेंडूंत ३ चौकारांसह ४१ धावा काढून बाद झाला. यानंतर मनदीपने पांडेला साथीला घेत धावांचा वेग वाढविला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. शतकाला पाच धावांची गरज असताना मनदीपसिंग बाद झाला. त्याने ९५ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना एक वेळ ऑस्ट्रेलियाचा संघ ३५ षटकांत ३ बाद १६८ अशा स्थितीत होता. शेवटच्या १५ षटकांत त्यांना १०० धावांची भर घालायची होती. पण यानंतर चहलने आपल्या फिरकीच्या जाळ्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अचूक पकडले. ऑस्ट्रेलियाचे अखेरचे सहा फलंदाज २६ धावांत माघारी परतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here