पिंपरी : ढोल-ताशांच्या दणदणाटात, ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया….’ अशा जयघोषात उद्योगनगरीत लाडक्या गणरायाचे आगमन झाले. बाप्पाच्या आगमनाने उद्योगनगरी गणेशमय झाली आहे.
गणेशोत्सवाची सुरुवात आज झाली. गणरायाला घरी आणण्यासाठी आबालवृद्ध गणेशभक्तांची दिवसभर लगबग सुरू होती. दिवसभर भक्तांमध्ये अपूर्व चैतन्य जाणवत होते. सकाळच्या वेळी भक्तांनी घरी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली़ त्याचबरोबर उद्योगनगरीतील अनेक कंपन्यांमध्ये कंपन्यातील उत्सवाची सुरुवात झाली.
बाजारात विविध स्टॉलवर गणपती बाप्पांना घरी नेण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती़ पिंपरी आणि चिंचवडमधील प्रमुख बाजारपेठेतही पूजेचे साहित्य घेण्यासाठी गर्दी झाली होती.
धूप, अगरबत्ती, तेलाच्या वाती, सुपारी, श्रीफ ळ आदी पूजा साहित्य आणि मिठाईच्या दुकानात पेढे, मोदक खरेदी करण्याची लगबग सुरू होती. दुपारनंतर अनेक मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात गणपतीची मिरवणुकीद्वारे बाप्पाला घरी आणले. शहरातील ८१८ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. पिंपरी-चिंचवड, दापोडी, बोपोडी, खडकी, निगडी, नेहरुनगर, सांगवी, वाकड, भोसरी, थेरगाव, आकुर्डी या परिसरातील विविध मंडळांनी गणपती बाप्पांचे उत्साहात स्वागत केले़ (प्रतिनिधी)
गर्दीमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात वाहतूक कोंडी
पिंपरी : गणेशमूर्ती खरेदीसाठी सकाळपासूनच स्टॉलवर गर्दी असल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेही अवघड झाले होते. त्यात बेशिस्त वाहनचालकांनी रस्त्यातच मोटारी उभ्या केल्यामुळे या कोंडीत अधिकच भर पडली. पिंपरीतील शगून चौकात तर पिंपरीकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. चिंचवडगाव, निगडी, भोसरी, काळेवाडी, थेरगाव, वाकड अशा विविध ठिकाणी गणेशमूर्तींचे स्टॉल उभारण्यात आले होते.
स्टॉलवर आज दिवसभर गर्दी होती. वाहतूककोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभागातर्फे वाहतूक पोलीस तैनात होते. काळेवाडीहून पिंपरीकडे येणारा रस्ता, शगून चौक परिसरातही कोंडी झाली होती. सायंकाळच्या दरम्यान काळेवाडीहून पिंपरीकडे येणारी वाहतूक इंदिरा गांधी उड्डाणपुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. पिंपरीतून पिंपळे सौदागरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि भोसरीतील पीएमटी चौकातही कोंडी झाली होती.