अभिज्ञा भावे
मला लहानपणापासून खूप इच्छा होती की आपल्या घरी गणपती आणला जावा. पण काही कारणास्तव ते जमू शकलं नाही. मात्र, इथे सासरी आम्ही गेली पाच वर्ष दीड दिवसांचा गणपती आणत होतो. यंदा मात्र आम्ही गणपती आणला नाही. बाप्पाचं आणि प्रत्येक व्यक्तीच वेगळं असं नातं असतं. तो सगळ्यांसाठी देव तर आहेच पण मित्रही आहे. माझ्यासाठी गणपती हे खूप जवळचं दैवत आहे.
बाप्पाचं आगमन झालं की सर्व वातावरण प्रसन्न होतं. बाप्पाची आरास करताना पर्यावरणस्नेही वस्तूंचा वापर केला जाईल याची मी पुरेपूर काळजी घ्यायचे. त्यामुळे थर्माकॉलसारख्या वस्तूंचा वापर प्रकर्षाने टाळला जायचा. मी स्वतः पर्यावरणस्नेही असल्यामुळे यासंबंधी खूप काळजी घ्यायची. बाप्पाची आरास करण्यासाठी एक वर्ष साड्यांचा वापर केला होता. त्यानंतर घरात काही टाकाऊ वस्तू होत्या त्यांचाही वापर केला होता. यादरम्यान माझी आई-बाबांशीही भेट होत होती. माझे आई-बाबा दुबईला राहतात. त्यामुळे ते गणपतीच्या निमित्ताने घरी बाप्पाचा आशिर्वाद घेण्यासाठी यायचे. तसेच, सर्व मित्रमंडळीही घरी आल्याने गप्पागोष्टी व्हायच्या. ते दीड दिवस घरी आनंदी वातावरण असायचं. बाप्पाच्या नैवेद्यासाठी खोब-याच्या सारणात पेढा घालून त्याचे मोदक केले जायचे. बाप्पाचं विसर्जनही आम्ही गणेशोत्सव काळात बांधण्यात आलेल्या कृत्रिम तलावात केले होते.
खुलता कळी खुलेनाच्या सेटवरही आता गणेशोत्सवाच वातावरण आहे. इथेही दीड दिवसांचा गणपती दाखलवल्याने खूप मजामस्ती चालू आहे. आम्ही तर मोदक खाण्याचीही स्पर्धा रंगली होती. एका सीनमध्ये आम्हाला मोदक खायचे होते. त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त मोदक खाता यावे म्हणून आम्ही रिटेकवर रिटेक देत होतो. मीसुद्धा सर्वांसाठी मोदक घेऊन जाणार आहे.