शिवानी रांगोळे

आमच्याकडे मी लहान असल्यापासून गणपतीची प्रतिष्ठापना केली जातेय. आधी माझ्या काकांच्या घरी गणपती बसवायचो. तेव्हा आमचं संपूर्ण कुटुंब तिथे एकत्र जमायचं. पण नंतर आम्ही पुण्यात राहायला गेलो. मग आम्ही तिथे गणपती आणण्यास सुरुवात केली. आमच्याकडे पाच दिवसांचे गौरी-गणपती असतात. दरवर्षी आम्ही एक थीम ठरवतो. गेल्यावर्षी मोरपंखी थिम होती. त्यानुसार सर्व सजावट करण्यात आली होती. गौरीला तशाप्रकारची साडी नेसवण्यात आली होती. यावर्षी आम्ही साउथ इंडियन थीम ठरवली आहे. त्यासाठी आम्ही साउथ इंडियन टाइपच्या टिपिकल चेक्स आणि काट असलेल्या साड्या आणल्या आहेत. तसेच मी आणि आई मिळून ख-या फुलांचे गजरे बनवणार आहोत. फुलांचे गजरे करून त्यांच्या माळा गौरी-गणपतीच्या बाजूने लावण्यात येतील. आम्ही सहसा जास्त सजावट करण्याकडे भर देत नाही. कारण, त्यामुळे मग गणपतीच महत्त्व कमी होत असं मला वाटतं. सजावटीसाठी जास्त काही सामान न वापरता ओढण्या आणि घरगुती वस्तूंमधून जितकं डेकोरेशन करता येईल ते आम्ही करतो. यावेळी आमच्या सोसायटीतली लहान लहान मुलंही मदतीला येतात.
शास्त्रानुसार आमच्याकडे बैठी मूर्ती आणली जाते. तसेच उभ्या गौरी आणल्या जातात. ही मूर्ती इकोफ्रेण्डली असते. १८ भाज्या, भात, वरण, मोदक असा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. या दिवसांत मी आणि आई आम्ही दोघीही पोथी वाचतो. सात दिवसांत आम्ही गणेशपुराण वाचन पूर्ण करतो. आमच्याकडे रांगोळी काढण्याचा मोठा कार्यक्रमचं रंगतो. मी अगदी लहान असल्यापासून आम्ही पेपरात ज्या काही डिझाइन यायच्या त्यांची कात्रण काढून ठेवायचो. त्याप्रमाणे मी आणि आई मिळून सुंदर रांगोळी काढतो. यामध्ये मग सोसायटीमधली मुलंही सहभागी होतात. या दरम्यान माझ्याकडे बाप्पाचं सर्वात मोठं काम दिलं जातं. बाप्पाच्या आरतीची तयारी करणं हे माझं काम आहे. आरतीचा पाट मांडून ठेवण्याचं काम मी करते. मी बाहेर कुठेही असले तरी यासाठी मग मला घरी यावचं लागतं. पाच दिवसांनंतर आम्ही बाप्पाचे हौदात विसर्जन करतो. प्रदूषण टाळण्यासाठी नदीत विसर्जन केले जात नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here