पुनर्भेट घडवून आणण्यासाठी शहराच्या मध्यभागात पाच ठिकाणी पोलीस मदत कक्ष
परगावाहून खास गणेशोत्सवासाठी मध्य पुण्यात दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यासाठी येणाऱ्यांच्या गर्दीत लहान मुले हमखास हरवतात. हरवलेली मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलिसांनी शहराच्या मध्यभागात पाच ठिकाणी पोलीस मदत कक्ष सुरू केला आहे. त्या माध्यमातून हरवलेल्या मुलांचा आणि पालकांचा शोध घेण्यास मदत होत आहे. संभाव्य घातपाती कारवायांच्या पाश्र्वभूमीवर भाविकांना मदत कक्षातून सूचनादेखील दिल्या जात आहेत.
शहराच्या मध्यभागातील बेलबाग चौक, मंडई, बुधवार चौक, दत्त मंदिर, गाडगीळ पुतळा येथे मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. गणेशोत्सवात शहराच्या मध्यभागात भाविकांची मोठी गर्दी होते. मानाची मंडळे तसेच आकर्षक देखावे करणारी मंडळे या भागात आहेत. मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी परगावाहून नागरिक मोठय़ा संख्येने येतात. या गर्दीत लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक हरवतात. त्यामुळे पोलिसांनी शहाराच्या मध्यभागात पाच ठिकाणी मदत कक्ष सुरू केला आहे, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.
शनिवार, रविवार आणि सोमवारी बकरी ईदची सुटी आल्याने मध्यभागात मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी मध्यभागातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिसांनी लक्ष्मी रस्त्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तेथे अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एक पोलीस उपायुक्त, दहा अधिकारी आणि ५० पोलीस शिपाई असा बंदोबस्त लक्ष्मी रस्त्यावर ठेवण्यात आला आहे.
संभाव्य घातपाती कारवायांच्या पाश्र्वभूमीवर साध्या वेशातील पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. प्रशिक्षित श्वानांकडून मध्यभागातील मंडळांच्या मंडपाची तपासणी करण्यात येत आहे. पाच ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या मदत कक्षात ध्वनिवर्धक बसविण्यात आले आहेत. त्या माध्यमातून भाविकांना एकेरी पादचारी मार्ग योजना व अन्य सूचना दिल्या जात आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मदतकक्षामुळे गर्दीत चुकलेली मुले, ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेण्यास मदत होत असल्याचाही पोलिसांचा अनुभव आहे. पोलिसांनी शिवाजी रस्त्यावर सुरु केलेल्या पादचारी योजनेचा फायदा झाला आहे. बुधवार चौक ते बेलबाग चौक दरम्यान पोलिसांनी बॅरेकेटींग केले आहे. भाविकांना जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे शिवाजी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. गर्दी वाढल्यानंतर मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.
पतीच्या ‘सेल्फी’मग्नतेमुळे चुकामूक
मध्यभागातील बाबूगेनू मंडळांचा देखावा पाहण्यासाठी पत्नी आणि मुलांसोबत एक तरुण आला होता. या कुटुंबातील मोबाईलवर सेल्फी काढण्यात दंग असलेला पती आणि मुलगा गर्दीत चुकल्याची घटना घडली. त्यानंतर पत्नीने मंडईतील पोलीस मदत कक्षात धाव घेऊन या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लगेचच ध्वनिवर्धकावरुन ही माहिती प्रसारित केली. त्यामुळे चुकलेला तरुण आणि मुलाचा शोध लागला. गर्दीत चुकलेल्यांचा शोध लागतो. मात्र, त्यांचा शोध लागेपर्यंत कुटुंबीय मात्र रडवेले होते.