अमृता सुभाष : नाट्य परिषदेच्या शाखेचा वर्धापनदिन
पिंपरी : स्मिता पाटील यांच्याकडे बघत बघतच अभिनय क्षेत्राची सुरुवात केली. आणि त्यांच्या नावाने जो पुरस्कार मिळाला त्यामुळे मन भारावून गेले आहे, अशा शब्दात अभिनेत्री अमृता सुभाष यांनी मत व्यक्त केले.
चिंचवड येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचा 20 वर्धापनदिन सोहळ्याचे उदघाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांना कै. स्मिता पाटील पुरस्काराने गौरविण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होती. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राहूल भोसले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे, हनुमंत गावडे, स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी, माजी महापौर योगेश बहल, कार्यक्रमाचे आयोजक व नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रंगभूमीच्या सेवेबद्दल रंगकर्मी व ज्येष्ठ कलाकारांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये कै. बालगंधर्व पुरस्कार अजय पूरकर, कै. आचार्य अत्रे पुरस्कार दिगंबर नाईक, कै. अऱुण सरनाईक पुरस्कार राहूल सोलापूरकर, कै. जयवंत दळवी पुरस्कार शिरीष लाटकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह व दहा हजार रुपये रोख रुपये असे होते.
यावेळी बोलताना अमृता सुभाष म्हणाल्या, स्मिता पाटील यांच्या अभिनयाकडे बघत बघतच अभिनयाचे धडे शिकले. मध्यंतरी कान फेस्टिव्हल अंतर्गत रामनराघव या चित्रपटाबद्दलचा कान फेस्टिवलचा पुरस्कार मिळाला. आणि हा पुरस्कार स्मिता पाटील नंतर मिळविणारी मी दुसरी अभिनेत्री आहे, याचा अभिमान वाटत आहे.
अजय पूरकर यांनी बोलताना, अभिनय क्षेत्रासाठीचा बालगंधर्व पुरस्कार कोणाला द्यायचा याबबत संयोजकांना प्रश्न पडला असेल. भयानक दिसणा-या माणसाला हा पुरस्काराने मिळाल्याने कामाची जबाबदारी वाढली आहे,.लवकरच ऐतिहासिक चित्रपट घेऊन आपल्यासमोर येत आहे. या चित्रपटाला ही प्रेक्षक दाद देतील, पुरस्कार मिळाला म्हणजे कामाची जबाबदारी वाढली. पुरस्काराने कौतुकाची थाप तर पडतेच जबाबदारीही वाढत असल्याचे सांगितले.
कै. अरुण सरनाईक पुरस्कार मिळालेले राहूल सोलापूरकर, आचार्य अत्रे पुरस्कार स्वीकारताना दिगंबर नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले.
नाशिक अखिल मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम म्हणाले, विशेष पुरस्कार हा काळजाला भिडणारा आहे. अनेक नाटकांचे प्रयोग केले. नाटकाचे प्रयोग करताना अनेक दिग्गजांचे भाग्य मला लाभले. महाराष्ट्रातील कलावंतासाठी व्यासपीठ असावे अशी मागणी त्यांनी यावेळी अजित पवार यांच्याकडे केली.
तत्पूर्वी भाऊसाहेब सांगळे, सोनाली गायकवाड, पद्मजा कुलकर्णी यांना यावेळी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाआधी कलाकारी हा प्रभाकर पवार लिखित कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले. प्रास्ताविक भाऊसाहेब भोईर
यांनी केले.