पिंपरी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते पिंपरी-चिंचवड महापालिकेचे छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक देऊन मुंबई येथे गौरव करण्यात आला.
माहिती महासंचालक ब्रिजेश सिंह, पद्मश्री छायाचित्रकार सुधाकर ओलवे आदी या वेळी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये 3800 छायाचित्रांमधून देवदत्त कशाळीकर यांना प्रथम पारितोषिक, तर विद्याधर राणे (मुंबई) यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक, दिनेश भडसाळे (मुंबई) यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. तसेच यावेळी 1 हजार रूपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसेही देण्यात आली. त्यासाठी सचिन मोहिते (नांदेड), अशोक पाटील (धुळे), चंद्रकांत पाटील (अकोला), शरद पाटील (कोल्हापूर) तर सतीश काळे (नाशिक) यांची निवड करण्यात आली.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, या छायाचित्र प्रदर्शनात मांडण्यात आलेली सर्व छायाचित्रे अत्यंत सुंदर आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने चांगली संकल्पना प्रत्यक्षात आणली. राज्यात दोन वर्षात घडलेल्या परिवर्तनाचे प्रतिबिंब या छायाचित्रांमधून उमटले आहे. एखादी गोष्ट प्रत्यक्ष बघितल्याशिवाय विश्वास बसत नाही अशा वेळी छायचित्र ही महत्वाची भूमिका बजावत असतात.
प्रदर्शनातील छायाचित्रांमधून मेक इन महाराष्ट्र, जलयुक्त शिवार, स्मार्ट सिटी अशा विविध शासकीय योजनांच्या यशाचे प्रतिबिंब उमटले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील गड किल्ले, कला, संस्कृती, वन्यजीव, बहुविविधतेचे आणि एकात्मतेचे दर्शनही होत आहे. या प्रदर्शनातील छायाचित्रांचा समावेश असलेले ‘कॉफी टेबल बूक’ तयार करावे. राज्यात येणार्या परदेशी शिष्टमंडळांना हे पुस्तक सचित्र महाराष्ट्राचा ठेवा म्हणून भेट देता येईल, दरवर्षी अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
देवदत्त कशाळीकर यांनी कोल्हापूरजवळील नरसोबाचीवाडी येथील खिद्रापूरचे सहाव्या शतकातील चालुक्य राजवटीतील दुसर्या पुलकेशी राजाने बांधलेल्या शिवमंदिराची छबी टिपली आहे्. वास्तुशास्त्र व स्थापत्य शास्त्राचा हे मंदिर उत्तम नमुना आहे. तसेच मंदिराशेजारी एक उर्दु शाळा आणि एका बाजूला मराठी शाळा असे वातावरण आहे. जवळ असलेल्या दर्ग्यामध्ये गणपती बसवला जातो.
स्पर्धेच्या विषयाला धरून पर्यटन व राष्ट्रीय एकात्मता असा दुहेरी विचार यातून दर्शवण्याचा प्रयत्न छायाचित्रातून केला आहे. मुस्लिम घरातील एक बालक शालेय कार्यक्रमाला आईचे बोट धरून शिवाजी महाराजांचा पोशाख करून जाताना हे छायाचित्र टिपले आहे.
उत्कृष्ठ कोरीव काम आणि सुंदर शिल्पकला असलेल्या या अतिप्राचिन मंदिराबाबत मात्र पर्यटकांना विशेष माहिती नाही. या छायाचित्राच्या माध्यमातून वास्तुकलेचा हा अविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी आणि इतिहासाचा हा वारसा समजून घ्यावा असा यामागचा उद्देश असल्याचे कशाळीकर यांनी सांगितले.
या स्पर्धेला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची व पारितोषिक विजेत्यांची निवड ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे, गॅझेटियर विभागातील कार्यकारी संपादक डॉ. दिलीप बलसेकर, पीआयबीचे मुख्य फोटो अधिकारी अख्तर सईद, माध्यम तज्ज्ञ आशुतोष पाटील आदी मान्यवरांच्या समितीने केली आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचे विजेते देवदत्त कशाळीकर यांचा मुख्यमंत्र्यांचा हस्ते गौरव
![‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचे विजेते देवदत्त कशाळीकर यांचा मुख्यमंत्र्यांचा हस्ते गौरव](https://chaupher.com/wp-content/uploads/2016/10/kashalikar111.jpg)