Chaupher News
पुणे : कोरोना विषाणू पॉझेटिव्ह रुग्ण रहात असलेल्या परिसरातील घरांची तपासणी करून तपासणी करण्यासाठी ५१ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
कोरोना विषाणू रोगाने शहरात शिरकाव केल्याने महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोना विषाणू पॉझेटिव्ह पाच रुग्ण शहरात आढळून आल्याने महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून आता खबरदारीचे उपाय केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून कोरोना पॉझेटिव्ह दाम्पत्य रहात असलेल्या धायरी फाटा परिसरातील घरांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने ५१ पथके तयार केली आहेत. या पथकात घनकचरा विभाग, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग या विभागातील प्रत्येकी एका याप्रमाणे तीन कर्मचाऱ्याचा समावेश करण्यात आला आहे.
एका पथकाला ३५ घरांची तपासणी करण्याचे लक्ष देण्यात आले आहे. या तपासणीत घरात राहणाऱ्या व्यक्ती, त्यापैकी नोकरी व काम करणाऱ्यांचे कामाचे ठिकाण, विद्यार्थ्यांच्या शाळा, घरातील कोणी परदेशात गेले आहे का? घरातील किंवा नातेवाईकांपैकी कोणी परदेशात जाऊन आले आहे का? आदी माहिती संकलित केली जाणार आहे. हा सर्व्हे करण्याचे काम हाती घेण्यात आले असून जमा होणाऱ्या माहितीवरून योग्य तो उपाय आणि खबरदारी घेण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.