चिंचवड येथील अशोकचंद्र मुखर्जी यांचे दातृत्व; आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ सेवानिवृत्ताकडून साहित्य वाटप
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील एका सेवानिवृत्त गृहस्थाने आई-वडील आणि पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ शहरातील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयासाठी तब्बल 10 लाख रुपयाचे रुग्णोपयोगी साहित्य देणगी दाखल दिले आहे. या रुग्णोपयोगी साहित्यात 4 आयसियू बेड्स, बेडसाईड लॉकर व स्टूल, असे 10 लाखाचे साहित्य आज महापालिकेस देण्यात आले.
अशोकचंद्र मुखर्जी असे त्यांचे नाव आहे. चिंचवड शहरातील पूर्णानगर भागातील कामधेनू मीरा सोसायटीत ते वास्तव्यास आहेत. रेल्वे खात्यातील नोकरीतून ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहे. मूळचे कलकत्त्याचे असलेले मुखर्जी मागील तीस वर्षापासून पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. रेल्वेखात्यातील नोकरीनिमित्त सुरुवातीची काही वर्षे ते मुंबईत होते.
अशोकचंद्र मुखर्जी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ज्या शहरात राहिलो, ज्या शहरात आतापर्यंत उदरनिर्वाह करत आलो. त्या शहरासाठी काहीतरी देण्याची इच्छा होती. आयुष्यातील बराचसा काळही या शहरातच व्यतीत झाल्याने शहरातील रुग्णालयांसाठी साहित्य देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. मी कलकत्ता येथे कायमस्वरूपी राहण्यासाठी जाणार आहे. त्यापूर्वी हे साहित्य प्रदान करण्याची इच्छा होती, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पालिकेचे आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की एका महिन्यापूर्वी अशोकचंद्र मुखर्जी यांची भेट झाली होती.
त्यावेळी त्यांनी रुग्णालयासाठी 10 लाख रुपये देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी मी त्यांना पैशाऐवजी काही वस्तू देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी हे रुग्णोपयोगी साहित्य देण्याचे ठरवले.
वायसीएम रुग्णालयात झालेल्या छोटेखानी समारंभात हे साहित्य प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात महापालिकेच्या वतीने मुखर्जी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. अनिल रॉय, वायसीएम रुग्णालयाचे डॉ. देशमुख यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी
उपस्थित होते.