घाणेगावच्या विद्यार्थ्यांनी साधला अमेरीकेतील शिक्षकांशी संवाद
धुळे : साक्री तालुक्यातील घाणोगाव येथील जि.प.शाळा ही जिल्ह्यातील पहिली ’वायफाय’ शाळा ठरली असून या डिजिटल शाळेचे उद्घाटन शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी वायफायच्या माध्यमातून अमेरीकेतील शिक्षक अँडम ग्रीन यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला.
उद्घाटनाप्रसंगी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले, डाएटच्या प्राचार्या विद्या पाटील, माजी आ.जे.यू.ठाकरे, शिक्षण सभापती नूतन पाटील, गटशिक्षणाधिकारी भील, श्रीमती देवरे, शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र पगारे, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील, व्ही.व्ही. पवार, एस.ई.बागूल, प्रकाश पाठक, देशबंधू मंजू गुप्ता फाऊंडेशनचे राबसाहेब बडे आदी उपस्थित होते.
यावेळी नंदकुमार म्हणाले की, आजच्या आधुनिक काळात शिक्षण क्षेत्राला अलिप्त राहून चालणार नाही. तंत्रज्ञानाच्या, संगणकीकरणाच्या माध्यमातून शक्य तेवढया अत्याधुनिक सुविधा विद्यार्थ्यांना उलपब्ध होत आहेत. या सुविधांच्या मदतीने विद्यार्थ्यांना ज्ञानाचे नवीन स्रोत उपलब्ध व्हावेत हेच ध्येय शिक्षण विभागाचे आहे, असे सांगून त्यांनी डिजिटल शाळांसाठी प्रयत्नशील असलेल्या हर्षल विभांडीक याचे कौतुक केले. यावेळी ओमप्रकाश देखमुख यांनी घाणेगाव येथील शाळा ही जिल्ह्यातील पहिली ’वायफाय’ शाळा ठरली असल्याचे घोषित केले. यावेळी अमेरीकास्थित शिक्षक अँडम ग्रील यांनी न्युयॉर्क शहरातील ब्रुकलीन ब्रिज या ऐतिहासिक वास्तुबाबत माहिती सांगितली. तसेच विद्यार्थ्यांकडूनही आपले गाव, शहर आणि देशाबद्दल माहिती सांगण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक हर्षल विभांडीक याने केले. आभार मुख्याध्यापक किशोर पाटील यांनी मानले.