पिंपरी : जीएसटीचे दर निश्चित झाले असून 5, 12, 18 आणि 28 टक्के अशा 4 स्तरांच्या कराला जीएसटी कौन्सिलने मंजुरी दिली आहे. याबाबत शहरातील उद्योजकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर ही नवी कर प्रणाली एक एप्रिल 2017 पासून लागू करण्याचा सरकारचा मानस आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेले दर उद्योजकांसाठी चांगले आहेत. सरकारचे उद्योजकासाठीचे धोरण उद्योजकांना चालना देणारे आहे. उद्योजकाला याचा निश्चित फायदा होईल. पूर्वी 26 टक्के कर आकाराला जात होता. सध्या उद्योजकासाठी 12 ते 18 टक्के कर आकाराला जाणार आहे. त्यामुळे उद्योजकाला एकच कर भरावा लागणार आहे. या दरामुळे औद्योगिकनगरीतून बाहेर गेलेले अनेक मोठे उद्योग परत येतील. केंद्र सरकराच्या या दराचा उद्योजकांना फायदा होणार असल्याचे मत लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी व्यक्त करत या दरांचे स्वागत केले आहे.
केंद्र सरकारने जीएसटीचे दर निश्चित केले आहेत. सोन्या – चांदीवर किती दर लावले जाणार आहेत हे निश्चित नाही. सोन्यावर चार टक्के ‘जीएसटी’ लागू करण्याचा प्रस्ताव केंद्रातर्फे सादर करण्यात आला होता. मात्र, त्यावर एकमत झाले नाही. त्यामुळे त्यावरील निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. सोन्या – चांदीवर किती दर लावणार आहेत हे आठ दिवसानंतर स्पष्ट होणार आहे. त्यानंतर याच्यावर अधिक बोलणे उचित होणार असल्याचे मत रांका ज्वेलर्सचे तेजपाल रांका म्हणाले.
उद्योजकाला नेमका किती कर भरावा लागणार हे स्पष्ट झाले नाही. मात्र, विक्री दर समान असणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजक बाहेर जाणार नाहीत. स्थांलातरित झालेले उद्योग परत शहरात येण्याची आशा वाढली असल्याचे मत लघुउद्योजक संघटनेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांनी व्यक्त केले आहे.
केंद्र सरकारने जीएसटीचे दर निश्चित केले आहेत. जीएसटीचे लागू केलेले दर योग्य नाहीत. या दरामुळे छोट्या व्यापार्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून मोठ्या व्यापा-यांचा मात्र फायदा होणार आहे. जीएसटी कर का लावला, कर नेमके किती असणार हे सरकारने अद्याप स्पष्ट केले नाही. त्यामुळे दर निश्चित झाल्यावर याच्यावर अधिक बोलणार असल्याचे पिंपरी-रेडिमेड होलसेल असोशिएनचे अध्यक्ष महेश मोठवानी यांनी सांगितले.
जीएसटी लागू झाल्यावर मोबाईल आणि टेलिफोन बिल, मोबाईल फोन, अन्न, छोटी वाहने, दागिने, कुरिअर पाठवणे महागण्याची शक्यता आहे. तर, कपडे, मोठ्या मोटारी, फर्निचर, इलेक्ट्रानिक वस्तू, सिमेंट स्वस्त होवू शकते.