पिंपरी ः आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप दोघांमध्ये युती व्हावी यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. मात्र, गाफील राहणार नसल्याचे मत शिवसेनेचे शहर संपर्कप्रमुख अमोल कोल्हे यांनी पिंपरी येथे व्यक्त केले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी आयोजित कऱण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कोल्हे यांनी पक्षाची भूमिका मांडली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख राहुल कलाटे, नगरसेविका सुलभा उबाळे, भगवान वाल्हेकर, धनंजय आल्हाट, मधुकर बाबर, अमित गावडे, गजानन चिंचवडे उपस्थित होते.
कोल्हे यांनी या वेळी सांगितले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सत्तेवर असलेल्या भ्रष्टाचारी राष्ट्रवादी काँग्रेस हटविण्यासाठी शिवसेना आणि भाजप या समविचारी पक्षाने एकत्र यावे, अशी आमची भुमिका आहे. मात्र, एकत्र येण्यासाठी आधी एकमेकांवर विश्वास असणे गरजेचे आहे. आम्ही आमचा प्रस्ताव पक्षप्रमुखांकडे पाठवला असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत युतीबाबतचा निर्णय ते घेतील, असेही कोल्हे यांनी यावेळी सांगितले.
निवडणुकीनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पहिला महापौर हा शिवसेनेचाच असेल. युतीसंदर्भात जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्यूला अद्याप ठरला नाही. मात्र, शहरातील बलाबल ठरवून जागा मागण्यात येईल. शिवसेनेकडे शहरातील सर्व प्रभागात सक्षम उमेदवार असून आम्हाला इतर पक्षांसारखे उमेदवार आयात करण्याची गरज पडणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. शहरात कोणत्याही प्रभागात आयात उमेदवार कार्यकर्त्यांवर लादला जाणार नसून पक्षातील निष्ठावान आणि सक्षम उमेदवारालाच पक्षाकडून उमेदवारी देण्यात येईल, असेही कोल्हे यावेळी म्हणाले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, महापालिकेतील भ्रष्टाचारी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी युती गरजेची आहे. मात्र, भाजपकडूनही तेवढ्याच सकारात्मक मानसिकतेने पाऊल उचलले गेले पाहिजे. अटी ठेऊन युती शक्य नाही चर्चेमधूनच युतीचा निर्णय होईल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
शिवसेना पक्षाकडून महापालिका निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरपासून इच्छुकांचे अर्ज मागविण्यात येणार असून हे अर्ज आकुर्डी येथील सेना भवन येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.



















