चिकसे : राज्य परिवहन साक्री आगाराचे चालक दिनेश पाटील व वाहक राहुल बैसाणे यांनी प्रामाणिकपणा दाखवत प्रवाशाचे सव्वालाखाच्या ऐवजासह मोबाईल व कागदपत्रे परत केले. त्यामुळे पाटील व बैसाणे यांचे कौतुक होत आहे.
साक्री आगारातून पुणेसाठी सुटणार्या सायंकाळच्या सव्वासातच्या बसने पिंपळनेर बसस्थानकातून श्रद्धा रविंद्र घरटे या पुणे जात असताना त्यांची पर्स बमधून उतरताना बसमध्येच विसरल्या. त्या पर्समध्ये रोख रक्कम 30 हजार 910 रू. सोन्याच्या दोन अंगठ्या, चैन, डोरले असे अंदाजे तीन तोळे सोने सोबत मोबाईल, पॅन कार्ड, आधारकार्ड, मतदानकार्ड, वाहन परवाना अशी महत्वाची कागदपत्रे होती, असे साक्री आगाराचे वरिष्ठ लिपीक राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
बसच्या वाहक-चालकांच्या निदर्शनास सदर बाब लक्षात येताच त्यांनी ही पर्स साक्री आगारप्रमुखांकडे जमा केली. आगारप्रमुख उमेश बिरारी यांनी श्रद्धा घरटे यांच्याकडे पर्स सोपविली.