पुण्याच्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ज्या-ज्या जागा पाहिल्या जात होत्या तेथील शेतकरी विरोधासाठी पुढे येत होते किंवा जाणीवपूर्वक आणले जात होते. कारण, विमानतळाच्या विषयात राजकारण घुसले होते. याचा प्रत्यय
पदोपदी येत होता. सततच्या विरोधामुळे आणि विमानतळासाठी अपेक्षित अशी सलग जमीन उपलब्ध होत नसल्याने विमानतळ प्राधिकरणाने चाकण विमानतळाविषयी नकारात्मक सूर लावला, त्यातून व्हायचे ते झाले. विमानतळ
हातातून गेले. त्यानंतर, आता आरोप-प्रत्योराप सुरू झाले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी परस्परांवर खापर फोडण्याचे काम चालवले आहे. विमानतळ हातातून जाण्यास जबाबदार कोणीही असो. या निर्णयाचा सर्वाधिक फटका पिंपरी-चिंचवडला बसला आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
खेड-चाकणला होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ आता पुरंदर तालुक्यात होणार आहे. केंद्रात व राज्यात आघाडी सरकार असताना खेडमध्ये विमानतळ सुरू करण्याचे ठरले होते. त्यानुसार बराच कालावधी संथपणे सर्व प्रक्रिया सुरू होती. स्थानिक शेतकर्यांचा विरोध, खांदेपालट होताच विमानतळाची प्रक्रिया वेगवान झाली. पूर्वीचे ठिकाण बदलले. खेड-चाकण ऐवजी आता पुण्यापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर पुरंदरला नियोजित विमानतळ होत आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एवढ्यावरच मुख्यमंत्री थांबले नाहीत. छत्रपती संभाजी महाराज असे नव्या विमानतळाचे नावही त्यांनी जाहीर करून टाकले.
एकीकडे पुरंदरला नव्या विमानतळाच्या उभारणीसाठी सर्व गोष्टी जुळून येत असताना तेथेही विरोधाचे राजकारण सुरू झाले आहे. यापूर्वी खेडच्या जागेचा विचार होत असतानाही अशाच प्रकारे विरोध होत राहिल्याने ती जागा रद्द करण्याची वेळ शासनावर आली. वास्तविक पाहता विमानतळ झाल्यानंतर आजूबाजूचा परिसर मोठ्या प्रमाणात विकसित होत असतो. सर्वात महत्त्वाचे जमिनीच्या किंमती वाढतात. परिसरात नवनवे उद्योग स्थापन होऊ लागतात. पंचतारांकित हॉटेल येतात. उत्तम प्रतीच्या नागरी सुविधा होतात. जर एखाद्या प्रकल्पामुळे इतका कायापालट होणार असेल, तर विरोधाची दुर्बुध्दी का होत असावी या प्रश्नाला उत्तर नाही.
गेल्या कित्येक वर्षांपासून चाकणच्या विमानतळाचा घोळ सुरू होता. जागेसाठी अनेक गावे पाहण्यात आली; मात्र विमानतळाला आवश्यक असलेली सलग जमीन उपलब्ध होत नव्हती. जी जागा योग्य वाटत होती, तेथे तीव्र विरोध होत होता. त्यामुळे बराच काळ या विषयाचे घोंगडे; तसेच भिजत पडले होते. उद्योगपती बाबा कल्याणी यांचीही जागा पाहण्यात आली; मात्र तेथेही अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. ज्या जागा विमानतळासाठी पाहिल्या जात होत्या. तेथील शेतकरी विरोधासाठी पुढे येत होते. या विषयात राजकारण घुसले होते, याचा प्रत्यय पदोपदी येत होता. सततच्या विरोधामुळे आणि अपेक्षित अशी सलग जागा जमीन उपलब्ध होत नसल्याने विमानतळ प्राधिकरणाने चाकण विमानतळाविषयी नकारात्मक सूर लावला. त्यातून व्हायचे ते झाले. विमानतळ हातातून गेले. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वाधिक नुकसान पिंपरी-चिंवडचे झाले.
पुणे-मुंबई हमरस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी पिंपरी-चिंचवड वसलेले आहे. पिंपरी ते चाकण 15 ते 20 किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे चाकणला विमानतळ होणार म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली. अनेकांनी जमिनी घेतल्या. विमानतळाच्या अनुषंगाने काय करता येईल, त्याचे नियोजन केले. प्रत्यक्षात विमानतळाची जागा बदलल्याने अनेक गोष्टी नव्याने पुढे आल्या आहेत. आता पुरंदर विमानतळाच्या परिसरातील जमिनींचे भाव वाढू लागले आहेत. नव्या विमानतळाचे श्रेय घेण्याची वेगळीच चढाओढ सुरू झाली आहे. त्याही ठिकाणी नव्याने विरोधाचे राजकारण होऊ लागले आहे.
वास्तविक, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी नव्या विस्तृत विमानतळाची तातडीची गरज आहे, हे लक्षात घ्यायला कोणी तयार नाही. प्रत्येकजण आपापली राजकीय पोळी भाजण्याचाच विचार करत आहे, हे या दोन्ही शहरांचे दुर्दैव आहे.