हजार व पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे देशातील सर्व विषय बाजूला पडले. प्रत्येक गल्लीत, चौकात, घराघरात, हॉटेलमध्ये, सार्वजनिक ठिकाणी हा एकच विषय चर्चेला होता. त्याचे कवित्व अजून संपलेले नाही. नोटा रद्द केल्या. पर्यायी व्यवस्था न झाल्याने लाखो नागरिकांचे प्रचंड हाल झाले. जे प्रवासात होते, ज्यांचे कुटुंबिय रूग्णालयात होते, अशांना सर्वाधिक त्रासाला सामोरे जावे लागले. नव्या नोटा बँकामध्ये येतील, अशी घोषणा झाली. प्रत्यक्षात तसे वेळेत झाले नाही. एटीएम सेंटरमध्ये पैसे येतील, असे सांगण्यात आले. मात्र, तिथे नोटा पोहोचल्याच नाहीत. यामुळे जिकडे-तिकडे गोंधळ उडाला. काहींच्या लग्नांमध्ये अडथळे निर्माण झाले. कोणाचे रूग्ण वेठीस धरले गेले. हॉटेलवाले, पेट्रोलपंपवाले अडवणूक करू लागले. भाजीमंडई ओस पडली, सोन्याच्या दरवाढीने आकाश गाठले. अशा एक ना शंभर गोष्टी घडल्या. त्यातून समाजजीवन ढवळून निघाले.
वेळ – 8 नोव्हेंबर 2016 रोजी, रात्री आठ वाजता
कोणाच्याही मनीध्यानी नसताना अनपेक्षितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला उद्देशून भाषण करण्यासाठी दूरचित्रवाहिन्यांवर येतात आणि विविध तर्कवितर्कांना सुरूवात होते. देशापुढील सध्याची स्थिती पाहता पाकिस्तानच्या विरोधात युध्दाची घोषणा ते करतात की काय, अशी शंकाही अनेकांच्या मनात येऊन गेली. प्रत्यक्षात, देशभरात हलकल्लोळ उडवून देणार्या निर्णयाची घोषणा ते करत होते. अतिशय गंभीर भावमुद्रा असलेल्या मोदी यांनी चलनातील हजार व पाचशे रूपयांच्या नोटा रात्री बारा वाजल्यापासून रद्द करण्यात येत आहेत, अशी घोषणा केली. त्यांच्या घोषणा ऐकून प्रत्येकाला काय-काय वाटले, कित्येकांचे होत्याचे नव्हते कसे झाले, याचे वर्णन शब्दात करणे शक्य नाही.
मोदी यांच्या या निर्णयामुळे देशातील सर्व विषय बाजूला पडले. प्रत्येक गल्लीत, चौकात, घराघरात, हॉटेलमध्ये, सार्वजनिक ठिकाणी हा एकच विषय चर्चेला होता. हा निर्णय होऊन आता आठवडा उलटला, तरी याचे कवित्व अजून संपलेले नाही. नोटा रद्द केल्या. मात्र, पर्यायी व्यवस्था न झाल्याने लाखो नागरिकांचे प्रचंड हाल झाले. जे प्रवासात होते, ज्यांचे कुटुंबिय रूग्णालयात होते, अशांना सर्वाधिक त्रासाला सामोरे जावे लागले. नव्या नोटा बँकामधील येतील, अशी घोषणा झाली. प्रत्यक्षात तसे वेळेत झाले नाही. एटीएम सेंटरमध्ये पैसे येतील, असे सांगण्यात आले. मात्र, तिथे नोटा पोहोचल्याच नाहीत. यामुळे जिकडे-तिकडे गोंधळ उडाला. काहींच्या लग्नांमध्ये अडथळे निर्माण झाले. कोणाचे रूग्ण वेठीस धरले गेले. हॉटेलवाले, पेट्रोलपंपवाले अडवणूक करू लागले. भाजीमंडई ओस पडली, सोन्याच्या दरवाढीने आकाश गाठले. अशा एक ना शंभर गोष्टी घडल्या.
बँका, एटीएमपुढे रांगाच रांगा लागल्या, वादावादी झाली. गेल्या काही दिवसांपासून हे वातावरण सुरू आहे. तथापि, कमी न होता गोंधळ वाढतच आहे. नरेंद्र मोदी यांचा निर्णय चांगला आहे, त्याचा अभिमान वाटतो, यानिमित्ताने काळा पैसा बाहेर येईल, अनेक चुकीच्या गोष्टींना आळा बसेल, असा सार्वत्रिक सूर असला तरी नागरिकांचे होणारे हाल त्यामुळे दुर्लक्षित करता येणार नाहीत. कारण, देशाच्या कानाकोपर्यात असलेल्या विविध नागरिकांना झालेला त्रास दूरचित्रवाहिन्यांनी अचूक टिपला होता आणि तो जनतेपुढे मांडला होता. त्याची तीव्रता पाहूनच एकीकडे मोदींचे कौतुक होत असतानाच राहूल गांधी, कपिल सिब्बल, उध्दव ठाकरे, अरविंद केजरीवाल, अजित पवार आदींनी विरोधी सूर काढलाच होता. वेगवेगळे मुद्दे त्यांनी उपस्थित केले. त्यामागे राजकारण त्यांचे होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या नेत्यांचा उद्देश एकच होता. तो म्हणजे ज्यांना या त्रासातून जावे लागले, त्या नागरिकांच्या नाराजीचा फायदा उठवता आला तर आला, ही त्यामागची खेळी होती. प्रत्यक्षात वेगळेच चित्र पुढे येऊ लागले आहे. पुण्यात कचर्यात नोटा आढळल्या, तिकडे गंगेत फाटलेल्या नोटा होत्या. मध्यप्रदेशात चार कोटी रूपये घेऊन निघालेली मोटार पकडण्यात आली.
काळा पैसा बाळगणार्यांचे काही दिवसांपासून काय उद्योग सुरू आहेत, त्यांच्याकडील भरभक्कम निधी कुठे उपयोगात आणायचा, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या अनेक वार्ता कानावर येत आहेत. म्हणजे, ज्या हेतूने मोदींनी असा निर्णय घेतला, त्याचे अपेक्षित परिणाम दिसू लागले आहेत. 31 डिसेंबरनंतर खरे दोन नंबरवाले रडारवर राहतील. कारण, त्यानंतर आणखी कठोर पाऊले, उचलण्याचे संकेत मोदी यांनी दिले आहेत. यापुढील काळात तरी सर्वसामान्यांना फारशी झळ बसणार नाही, अशी आशा करायला हरकत नाही. भाजपनेही ‘सर्जिकल स्ट्राईक’चा राजकीय उपयोग करून पाहिला. तसा उपयोग या विषयात करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.