पिंपरी ः गेल्या काही वर्षात काही लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेल्या कामावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि नंतर तोडपाणी करण्यासाठी बसायचे मात्र तोडपाणी झाली नाही की पुन्हा महापालिका सभागृहात भ्रष्टाचाराचे आरोप करायचे व त्या विकासकामांना खीळ बसविण्याचा खटाटोप करायचा प्रयत्न वारंवार केल्याचा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवरील बंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसेल, अशी टिका अमर साबळे यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत केली होती. याचा चांगलाच समाचार आज झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी घेतला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी विधानपरिषदेचे उमेदवार अनिल भोसले, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, पक्षनेत्या मंगला कदम, योगेश बहल, माजी आमदार आण्णा बनसोडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, नाना काटे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले की, पैसा आणि दादागिरीच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाहीत. भाजपने यासंदर्भात केलेले आरोप अशोभनीय व केविलवाणे आहेत. आम्ही केलेल्या विकासकामांवर जनतेकडे मते मागणार आहोत. जनतेचा कौल महत्वाचा आहे. जनतेच्या निर्णयापुढे सर्व गोष्टी गौण असतात. विधानपरिषद निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीत लक्ष घालणार, असे सांगत या निवडणुकीत महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था या महत्वाच्या मुद्यांवर भर असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
भाजपमध्ये कोणीही गेले की भ्रष्ट नेतेही पवित्र होतात, अशी धारणा निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, भ्रष्टाचाराचे आरोप करणारेच तोडपाणी करतात. त्यामुळे चांगल्या विकासकामांना नेहमीच खीळ घालण्याचे काम सभागृहात होते, अशा प्रकारचे सडेतोड उत्तर खासदार अमर साबळे यांनी केलेल्या आरोपांवर अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.
तसेच पाचशे व हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय चांगला आहे. मात्र, त्यामुळे सोन्याचे दर एका रात्रीत वाढले तर शेअर मार्केट कोसळला. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्यांनाच बसणार आहे, असे मत व्यक्त करत परदेशातील काळा पैसा आणण्यात सरकारला अपयश आले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
शहरातील तिनही आमदारांवर अजित पवार यांनी निशाना साधला. ते म्हणाले की, शहरात भाजप आणि शिवसेनेचे आमदार आहेत. सत्ता मिळून दोन वर्षे झाली. मात्र शहराच्या विकासात भर पडणारी एकही कामगिरी तिघांनाही करता आलेली नाही. या उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहराच्या विकासासाठी ठोस पावले उचलली आहेत, असेही पवार
यावेळी म्हणाले.