पिंपरी :- महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दि.१६ डिसेंबर ते १८ डिसेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. प्रतिदिन सरासरी साडेतीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी पवनाथडीला भेट दिली आहे. गत पवनाथडी जत्रेच्या तुलनेत यावर्षी नागरिकांच्या संख्येत वाढ झाली असून आर्थिक उलाढाल देखील वाढली असल्याची माहिती उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली आहे.
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सांगवी येथील पीडब्लूडी मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१६ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत होत असलेल्या पवनाथडी जत्रेत खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
महापालिकेच्या वतीने सुमारे सातशे पेक्षा अधिक महिला बचत गटांना व्यवसाय करण्यासाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले असून या ठिकाणी त्यांच्याद्वारे व्यवसाय करण्यात येत आहेत. स्टॉल्सचे विविध विभागात वर्गीकरण करण्यात आले असून त्यामध्ये शाकाहारी, मांसाहारी आणि इतर वस्तू असे विभाग करण्यात आले आहेत. तसेच महिला बचत गटांना व्यवसाय करण्यासाठी स्टॉल्ससह टेबल, खुर्च्या, विद्युत व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, रुग्णवाहिका, अग्निशामक बंब, सुरक्षा यंत्रणा, मदत कक्ष अशा सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्टॉल्समध्ये राज्यातील विविध विभागातून आलेल्या महिला बचत गटांनी आपल्या खाद्यसंस्कृतींचा थाट मांडला आहे. मासे, मटन, चिकन, विविध प्रकारच्या बिर्याणी अशा विविध मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. शाकाहारी खवय्यांना पुरणपोळी, पुरण मांडा, सुकामेवा पासून बनवलेली विविध प्रकारची चिक्की, उकडीचे व विविध प्रकारचे मोदक, छोले मटार करंजी, खोबर करंजी, छोले भटुरे, दिल्ली चाट, गुजराती ढोकळा, फाफडा, दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ, महाराष्ट्रीयन झुणका भाकरी, थालीपिट, मेती धपाटे अशा रुचकर भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी लोक मोठ्याप्रमाणात जत्रेला भेट देत आहेत. त्यामुळे तीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी आतापर्यंत पवनाथडी जत्रेला भेट दिली असून यंदा जत्रेस भेट देणाऱ्या लोकांची संख्या विक्रमी असेल, तसेच आर्थिक उलाढाल देखील विक्रमी होईल, असे उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सांगितले.
महापालिकेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे दिव्यांगांसाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिवाय, यंदा प्रथमच तृतीयपंथीय घटकांसाठी देखील स्टॉल्स उपलब्ध करुन देण्यात आले असून या बचत गटांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स सुरु केले आहे. या स्टॉल्सला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे, असेही त्यांनी सांगितले.