पिंपरी : (दि. 29 नोव्हेंबर 2016) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेला भ्रष्टाचार आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी समितीतून उघडकीस आला आहे. यात दोषी असणा-या अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन लाच लुचपत शाखेकडून यांची चौकशी केली जावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली.
पिंपरी चिंचवड भाजपाच्या वतीने मंगळवारी (दि.29) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब पुतळ्यापासून महानगरपालिकेवर आ. जगताप यांच्या नेतृत्वाखाली मनपाच्या भ्रष्टाचाराविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे, भाजपा प्रदेश सदस्य प्रमुख एकनाथ पवार, महेश कुलकर्णी, ॲड. अमर मुलचंदानी, राजेश पिल्ले, सरचिटणीस प्रमोद निसळ, सारंग कामतेकर, बाबू नायर, युवा मोर्चा शहराध्यक्ष रवी लांडगे, नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे, गटनेत्या वर्षा मडिगेरी, नगसेवक शीतल शिंदे, राहुल जाधव, माजी नगरसेविका माई ढोरे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, रघुनंदन घुले, माऊली थोरात, राजेंद्र राजापुरे, चंद्रकांत नखाते, शरद बाराहाते, भाजपाचे अनुप मोरे, ॲड. मोरेश्वर शेडगे, विलास मडिगेरी, भरत लांडगे, हरेश तापकीर, अजय पाताडे, प्रकाश ढवळे, संदीप वाघेरे, राजेंद्र गावडे, जयनाथ काटे, गणेश वाळुंजकर, रामकृष्ण राणे, सलीम शिकलगार, मनोज तोरडमल आदींसह हजारों भाजपा कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
आ. लक्ष्मण जगताप मोर्चातील नागरिकांना म्हणाले की, पिंपरी मनपातील मूर्ती घोटाळा, शवदाहिनी घोटाळा या विषयांबाबत आयुक्त वाघमारे यांनी चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीच्या अहवालानुसार दोषी अधिका-यांवर फौजदारी कारवाई करावी. घरकुल प्रकल्पात बनावट कागदपत्रे देऊन बोगस लाभार्थींना घरे मिळवून देणा-या अधिका-यांची चौकशी करावी व याबाबत पोलिस तक्रार दाखल करावी. यातून भ्रष्ट अधिका-यांची साखळी उघडकीस येईल. चौकशी अहवालात दोषी असणारे ठेकेदारच महानगरपालिकेतील कॅन्टिनसाठी निविदा भरतात. विकासाच्या नावाखाली एकच रस्ता विनाकारण चारवेळा खोदून डांबरीकरण केला जातो. पर्यावरण व वृक्ष लागवडीच्या नावाखाली दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला जातो. वर्षानुवर्षे एकच ठेकेदार शिलाई मशीन पुरवठा करतो. स्थायी समिती व सर्व साधारण सभेत बेकायदेशीरपणे उपसुचना व ऐनवेळचे विषय मांडून सामान्य नागरिकांच्या पैशाची लूट केली जाते स्थायी समितीच्या बैठकीत विषय पत्रिकेवर 50 विषय असताना ऐनवेळचा विषय आणि उपसूचना 80 मांडल्या जातात. वाढीव खर्चाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची लूट केली जाते. आगामी काळात स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत प्रशासनाकडून ऐनवेळचे विषय मांडू देणार नाही. असे आ. जगताप यांनी सांगितले.
याविषयी बोलताना महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, मुर्ती खरेदी व शव दाहिनी बाबत चौकशी समितीचा अहवाल आला आहे. घरकुल, मुर्ती खरेदी व शव दाहिनी प्रकरणी कायदेशीर सल्ला घेऊन आठ दिवसात निर्णय घेऊ. स्थायी समिती किंवा सर्वसाधारण सभेत विसंगत व अवैध ठराव पास केल्यास तो थांबविण्याचा अधिकार मला आहे. निवडणूक काळात ऐनवेळचे चुकीचे विषय येणार नाहीत याबाबत दक्षता घेऊ. सभेत घेतलेले अवैध निर्णयांची अंमलबजावणी प्रशासन करणार नाही. असे स्पष्टीकरण वाघमारे यांनी शिष्टमंडळास दिले.
___________